मुंबई : राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कुष्ठ रुग्णांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती, त्यांचे पुनर्वसन यासंदर्भात समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीच्या अहवालानुसार सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
कुष्ठरोगी यांचे पुनर्वसन याबाबत सदस्य सर्वश्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, योगेश सागर, राजेश टोपे, प्रणिती शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुष्ठरोगाचे लवकर निदान व्हावे, तसेच त्यांना योग्य उपचार उपलब्ध व्हावेत, रुग्णांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रलंबित अनुदान तातडीने देण्यात येईल.
सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत म्हणाले, सन 2019-20 मध्ये 16 हजार 531 नवीन कुष्ठ रुग्णांचे निदान होऊन त्यांना उपचाराखाली आणण्यात आले. सन 2020-21 व सन 2021-22 मध्ये कोरोनाच्या महामारीमुळे प्राथमिक अवस्थेतील ज्या कुष्ठ रुग्णांचे निदान होवू शकले नाही, असे 17 हजार 14 कुष्ठरुग्ण सन 2022-23 मध्ये विविध उपक्रम प्रभावीपणे राबविल्यामुळे जानेवारी 2023 अखेर शोधण्यात आले. 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत आठ कोटी 66 लाख 25 हजार 231 लोकसंख्येची आशा व पुरूष स्वयंसेवकांमार्फत तपासणी करण्यात आली. या कालावधीत 6 हजार 731 कुष्ठ रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात आले. यामुळे ज्या व्यक्तीला कुष्ठरोग आहे,परंतु त्याची त्यांना जाणीव नव्हती, अशा व्यक्तींचे निदान करण्यात यश आले आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्यात कुष्ठरोग निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी सभागृहात दिली.