अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास शैक्षणिक, उद्योग कर्ज योजनांसाठी केंद्राकडून निधी

मुंबई :- मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज तर उद्योग- व्यवसायासाठी मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून कर्जस्वरुपात निधी उपलब्ध झाला असून, या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

अल्पसंख्याक विभागाच्या शैक्षणिक कर्ज, मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 नोव्हेंबर रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीदिनापासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये हे अर्ज स्वीकारले जाणार असून, या कार्यालयांचे पत्ते व संपर्क महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या योजनांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना १८ डिसेंबर रोजी अल्पसंख्याक अधिकार दिनी कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महामंडळामार्फत अल्पसंख्याकासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

कर्ज योजनांचे स्वरुप

केंद्र शासनाकडून मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध झाला आहे. या निधीमधून विविध कर्ज योजना राबविण्यात येणार असून, राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ, नवी दिल्ली यांनी या योजनांची दोन गटात विभागणी केली आहे.

शैक्षणिक कर्ज योजना

शैक्षणिक कर्ज योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या गटात देशांतर्गत शिक्षणासाठी २० लाख रुपये तर विदेशातील शिक्षणासाठी ३० लाख रुपयांची कर्ज मर्यादा निश्चित केली आहे. पहिल्या गटात शहरी भागासाठी १.२० लाख तर, ग्रामीण भागासाठी ९८ हजार आणि दुसऱ्या गटात ८ लाख रुपयांची उत्पन्नमर्यादा आहे.

मुदत कर्ज योजना

मुदत कर्ज योजनेसाठी पहिल्या गटात २० लाख तर, दुसऱ्या गटात ३० लाख रुपयांची कर्जमर्यादा असून उत्पन्नाची मर्यादा शैक्षणिक कर्ज योजनेप्रमाणेच निश्चित केली आहे.

सूक्ष्म पतपुरवठा योजना

सूक्ष्म पतपुरवठा योजनेत पहिल्या गटात प्रत्येक सदस्य एक लाख रुपयांप्रमाणे २० सदस्यांच्या एका गटास २० लाखांपर्यंत तर दुसऱ्या गटात प्रत्येक सदस्य दीड लाखाप्रमाणे २० सभासदांना ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा आहे. या योजनेची उत्पन्न मर्यादादेखील शैक्षणिक आणि मुदत कर्ज योजनेसारखीच राहील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ब्राह्मण समाजाची प्रतिष्ठा बहाली साठी ब्राह्मण सेनेची स्थापना! 

Fri Nov 11 , 2022
EWS आरक्षणाचे स्वागत! – राकेश त्रिपाठी. वाडी :- ब्राह्मण समाजाची ढासळलेली प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने नुकतीच ब्राह्मण सेना फाउंडेशन वाडी-वडधामना शाखेची स्थापना करण्यात आली आहे. या संदर्भात वाडीतील पत्रकार परिषदेत ब्राह्मण सेना फाउंडेशनचे वाडी-वडधामनाचे नवनियुक्त अध्यक्ष राकेश त्रिपाठी यांनी सांगितले की, ब्राह्मण समाजाला समाजात पुन्हा सन्मान मिळावा, त्यांच्या समाजातील विद्यार्थ्यांना ,युवकांना नोकरी-व्यवसाय संधी मिळावी,महिला, समाजातील तरुण यांना क्रियाशील बनवावे,धार्मिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com