– चित्रीकरणासाठी सात दिवसांत परवानगी
– सांस्कृतिक कार्य विभागाच्या 100 दिवस कार्यपूर्तीसंदर्भात सादरीकरण
मुंबई :- चित्रीकरणासाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या सुलभरीतीने व मुदतीमध्ये मिळाव्यात या दृष्टीने ऑनलाईन प्रणालीद्वारे एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. मुंबई व उपनगर परिसरात चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली अंतर्गत सात दिवसांत परवानगी मिळणार आहे. या प्रणालीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
विधीमंडळ येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या 100 दिवसांची कार्यपुर्तीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री ॲड आशिष शेलार, उद्योग मंत्री उदय सामंत, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 100 दिवस कार्यक्रम अंतर्गत उद्दिष्ट पुर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागाचे अभिनंदन केले.
ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत मुंबई व मुंबई उपनगरातील चित्रपट, टीव्ही मालिका, जाहिरातपट व माहितीपट इत्यादींच्या चित्रीकरणांसाठी एक खिडकी योजनेअंतर्गत आता सात दिवसांत परवानगी मिळणार असल्याची माहिती यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिली. ‘एक खिडकी प्रणाली ही राज्यभरातील चित्रीकरणाची परवानगी मिळविण्यासाठी निर्माते, निर्मिती संस्थांना आणि लोकेशन मॅनेजर यांना माहिती देणारी एकमेव ऑनलाईन प्रणाली असून महाराष्ट्रभर या प्रणालीचा विस्तार करण्यात आला असून त्या दृष्टीने प्रणालीचे अद्यावतीकरण करण्यात आले आहे.
एनडी स्टुडिओसाठी 130 करोड रूपये निधी
यावेळी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांच्या एन डी आर्ट वर्ल्ड परिचालनासाठी महाराष्ट्र शासनाअंतर्गत फिल्मसिटी मुंबईकडे सोपविण्यात आला असून, यासाठीचा धनादेश मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शासमार्फत हा स्टुडिओ दायित्व 120 कोटी व परिचालनासाठी 10 कोटी असे 130 कोटी टप्प्याने टप्प्याने प्रदान करण्यात आले असून, दायित्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
अहिल्यादेवींच्या कारकिर्दीतील बारव स्थापत्य कॉफीटेबल बुकचे प्रकाशन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त विशेष ग्रंथाचे आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकीर्दीतील बारव स्थापत्य या कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पाण्याचे महत्व जाणून राज्यातील जनतेसाठीच नव्हे तर विविध प्रांतातील लोकांसाठी जलस्त्रोताचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने अळिल्यादेवींनी बारवांची निर्मिती केली व आवश्यक त्या ठिकाणी त्यांचे जिर्णोद्धारही केले. या ग्रंथात अहिल्यादेवींच्या कारकिर्दीतील तसेच अन्य जीर्णोद्धारित काही निवडक बारव, पायविहिर, तलाव, पुष्करणी या जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्वाच्या असलेल्या स्थानांची. छायाचित्रांसह संक्षिप्तपणे माहिती देण्यात आली आहे.
जन्मशताब्दी निमित्त प्रकाशीत ग्रंथात जन्मस्थळ चौंडी, राजधानी महेश्वरी, उपराजधानी चांदवड, इंदूर येथील राजवाडा, कारकिर्दीतील प्रशासन, लोककल्याणकारी धोरण, न्यायदान, आर्थिक नियोजन, चलन, राजचिन्ह अश्या महत्वपूर्ण पैलू संदर्भात परंतु महत्वपूर्ण माहिती या ग्रंथात देण्यात आली आहे.