नागपूर :- राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार एप्रिल 2024 पासून राज्यातील 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्यात येत आहे. या योजनेचा नागपूर प्रादेशिक विभागामध्ये नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि भंडारा जिल्हयातील 9 लाख 48 हजार 798 कृषिपंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांच्या एप्रिल ते जून 2024 च्या त्रैमासिक वीजबिलांपोटी राज्य शासनाकडून 487 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम प्राप्त महावितरणला प्राप्त झाली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना वीजबिल प्राप्तीच्या पावत्या म्हणजेच शून्य वीजबिलांचे वितरण महावितरणकडून करण्यात आले आहे.
राज्यात महावितरणचे 47 लाख 41 हजार कृषिपंपधारक वीजग्राहक आहेत. या कृषिपंपांकडून 39 हजार 246 दशलक्ष युनिट वार्षिक वीजवापर होतो. शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे व अनियमित पर्जन्यमानामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केली आहे व त्याची अंमलबजावणी महावितरणकडून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार राज्यातील 44 लाख 28 हजार 564 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्याचा व त्यासाठी 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान महावितरणला देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. विदर्भात महावितरणचे एकूण 9 लाख 64 हजार 736 कृषिपंपधारक वीजग्राहक आहेत. यामध्ये 9 लाख 48 हजार 798 कृषिपंपांची क्षमता 7.5 अश्वशक्तीपर्यंत तर उर्वरीत 15 हजार 938 कृषिपंपांची क्षमता त्यापेक्षा जास्त आहे. या योजनेनुसार 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना एप्रिल 2024 पासून पाच वर्षांपर्यंत मोफत वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे विदर्भातील 9 लाख 48 हजार 798 कृषिपंपांच्या एप्रिल ते जून 2024 या त्रैमासिक वीजबिलांपोटी राज्य शासनाकडून 487 कोटी 58 लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना वीजबिलाची रक्कम प्राप्त झाल्याची पावती वितरीत करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत नागपूर प्रादेशिक विभाग अंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंत नागपूर जिल्ह्यातील 1 लाख 1 हजार 857 कृषिपंपधारक शेतकऱ्यांचे 39 कोटी 33 लाखाचे, वर्धा जिल्ह्यातील 82 हजार 210 कृषिपंपधारक शेतकऱ्यांना 39 कोटी 33 लाख, अकोला जिल्ह्यातील 67 हजार 644 कृषीपंपधारक शेतक-यांना 47 कोटी 49 लाख, अमरावती जिल्ह्यातील 1 लाख 43 हजार 789 कृषीपंपधारक शेतक-यांना69 कोटी 91 लाख, भंडारा जिल्ह्यातील 56 हजार 618 कृषीपंपधारक शेतक-यांना 32 कोटी 49 लाख, बोलढाणा जिल्ह्यातील 1 लाख 67 हजार 570 कृषीपंपधारक शेतक-यांना 82 कोटी 65 लाख, चंद्रपूर जिल्ह्यातील 47 लाख 834 कृषीपंपधारक शेतक-यांना 12 कोटी 88 लाख, गडचिरोली जिल्ह्यातील 41 हजार 748 कृषीपंपधारक शेतक-यांना 22 कोटी 70 लाख, गोंदीया जिल्ह्यातील 47 हजार 251 कृषीपंपधारक शेतक-यांना 37 कोटी 96 लाख, वाशिम जिल्ह्यातील 64 हजात 955 कृषीपंपधारक शेतक-यांना 43 कोटी 73 लाख आणि यवतमाळ जिल्ह्यातील 1 लाख 27 हजार 122 कृषीपंपधारक शेतक-यांचे 80 कोटी 97 लाखाचे चालू वीज बिल माफ़ झाले असून या सर्व शेतक-यांना पुढिल पाच वर्षे मोफत वीज उपलब्ध होणार आहे.