छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सर्वांसाठी अभिमानास्पद अन् प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवक्षेत्र मराडे पाडा, भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) लोकार्पण संपन्न

ठाणे :- देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, सर्वांसाठी दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. येथे महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवक्षेत्र मराडे पाडा, ता.भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) लोकार्पण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, प.पू. बालयोगी सदानंद बाबा, ह.भ.प डॉ.कैलास महाराज निचिते, राष्ट्रसंत नीलकंठ शिवाचार्य, प.पू. आलोकनाथ महाराज, खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार दौलत दरोडा, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश चौघुले, शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू चौधरी, विश्वनाथ पाटील, नरेंद्र पवार, जितेंद्र डाकी, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.डी. एस. स्वामी, अनंता भोईर, आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत त्यांनी कैलास निचिते व राजू चौधरी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराच्या संकल्पना व प्रत्यक्ष निर्माणाकरिता कौतुक केले. ते म्हणाले की, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आपल्या इष्ट देवतेचे मंदिरात जावून दर्शन घेवू शकतो. देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, त्यांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब आहे. अतिशय सुंदर, भव्य दिव्य असे हे मंदिर निर्माण करण्यात आले आहे.

या मंदिराला सुंदर तटबंदी आहे, अतिशय चांगले बुरुज आहे, दर्शनीय अशा प्रकारचा प्रवेशाचा मार्ग, बगीचा आहे आणि या मंदिराच्या माध्यमातून महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक आणि पुढे संभाजी महाराजांची वाटचाल असे अतिशय सुरेख प्रसंग उभे करण्यात आले आहेत. यातून प्रत्येकाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. जसे हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचे दर्शन पूर्ण होत नाही तसेच छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन पूर्णत्वास येत नाही.

आई जिजाऊंच्या संस्कारांनी अन् आशिर्वादाने शिवबा घडले. त्यांच्या प्रेरणादायी शिकवणीतूनच शिवरायांनी मुघलांच्या आव्हानांचा प्रतिकार करायला सुरुवात केली. प्रभू श्रीराम हे युगपुरुष होते. त्यांनी समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती निर्माण केली. त्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आहे. रावणाविरुद्ध लढताना जसे श्रीरामांनी सर्वसामान्यांना एकत्र केले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बलाढ्य फौजेविरुद्ध सर्वसामान्य जनतेतून शक्ती निर्माण केली आणि भगवा झेंडा फडकविला. जातीपातीत विभागलेला महाराष्ट्र महाराजांना अपेक्षित नाही. देव, देश आणि धर्मापायी सर्वस्व पणाला लावणारा, देशाचा गौरव वाढविण्याचा संकल्प करणारा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 300 वी जन्मशताब्दी साजरी होत असताना देश घडविण्याच्या कार्यात आपले योगदान देवू या, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, राज्य व केंद्र शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा म्हणून नोंद होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संगमेश्वर येथे देखील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. पानिपत येथील लढाई सर्वांना माहितच आहे. महादजी शिंदे यांनी गाजविलेला पराक्रम सर्वांना माहीत आहे. त्या ठिकाणीही भव्य स्मारक उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

आज लोकार्पण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शक्तीपिठाला तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात येईल. त्याचप्रमाणे भिवंडी-वाडा या रस्त्याचे कामही प्रगतीपथावर आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने या शक्तीपिठाकडील येणाऱ्या सर्व मार्गांचे नियोजन उत्तमरित्या करावे, येथे येणाऱ्या शिवप्रेमींसाठी आवश्यक सोयीसुविधा तयार कराव्यात. शासन यासाठी तत्पर असून याकरिता निधीची कमतरता पडणार नाही.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस आयोजन समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि लोकार्पण झालेल्या मंदिराची प्रतिकृती देवून सत्कार केला.

या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

साडे पाच वर्षीय आसर अहमद मोहम्मद सुलतानने ठेवला जीवनातील पहिला रोजा

Mon Mar 17 , 2025
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येथील सुफी लाईन सुफी नगर कामठी रहिवासी मोहम्मद सुलतान यांच्या साडे पाच वर्षोय चिमुकल्या आसर अहमद मोहम्मद सुलतान ने आपल्या जीवणातील पहिला रोजा उपवास ठेवला.सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी 4.15वाजेपासून ते सायंकाळी 5.50 पर्यंत रोजाच्या नियमानुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटी राहून अल्लाह प्रति श्रद्धा व्यक्त केली. आसर अहमद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!