राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज

– पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात तयारी पूर्ण

– विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण, शहरातील सौंदर्यीकरणाने नागरिकांमध्ये चैतन्य

– राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेला अभिनेते सलमान खान यांच्या शुभेच्छा अन् कैलाश खेर यांचे थीम साँग

चंद्रपूर :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. ‘मिशन ऑलिम्पिक 2036’ हे एकच ध्येय्य डोळ्यांपुढे ठेवून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा मंगळवार, २६ डिसेंबरला बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात सुरू होणार आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताचे चंद्रपूरनगरीचा चेहरामोहरा बदलला आहे. विविध चौकांचे सौंदर्यीकरण झाले असून नानाविध संकल्पनावर आधारित रंगबेरंगी चित्रांनी भिंती फुलल्या आहेत. अखिल भारतीय स्तरावरील या स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज झाली आहे.

देशगौरव,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे मिशन ऑलिम्पिकच्या निमित्ताने उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट ठेवूनच बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यानुसार, संपूर्ण तयारी झाली आहे. २६ ते ३१ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जवळपास ३ हजार खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच, पालक, क्रीडा प्रशिक्षक आदी लोक सहभागी होणार आहेत. त्यांच्या भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पडावी यासाठी आयोजन समिती, उद्घाटन समिती, स्वागत समिती, निवास व्यवस्था समिती, मदत कक्ष, भोजन समिती, क्रीडा कार्यक्रम व तक्रार निवारण समिती, स्थानिक पर्यटन समिती, प्रसिद्धी आणि पायाभूत सुविधा समिती, वाहतूक व्यवस्था समिती, सांस्कृतिक कार्य समिती, सुरक्षा समिती स्वच्छता समिती आदी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेळोवेळी आढावा घेऊन समायोजित निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुरूप स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.

अभिनेते सलमान खान यांच्या शुभेच्छा

भव्य अशा ६७ वी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी प्रसिद्ध अभिनेते सलमान यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर येथील क्रीडा संकुलमध्ये होणारी ही स्पर्धा यशस्वी व्हावी, अशी भावना अभिनेते सलमान खान यांनी त्यांच्या शुभेच्छापर संदेशातून व्यक्त केली आहे. त्याचसोबत जयंत दुबळे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू, रोहिणी राऊत ,माधुरी गुरनुले,ज्योती चव्हाण आंतरराष्ट्रीय धावपटू , सायली वाघमारे अथलेटिक्स परीक्षक यांनी देखील या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

थीम साँगला कैलाश खेर यांचे स्वर

६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी थीम साँग तयार करण्यात आले आहे. या गाण्याला प्रसिद्ध पार्श्वगायक कैलाश खेर यांनी आवाज दिला आहे. ‘आओ चंद्रपूर, खेलो चंद्रपूर… खेलो ऐसा दिल लेलो चंद्रपूर…’ असे शब्द असलेले हे गीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाची पेरणी करणारे ठरत आहे. लक्षवेधक शब्द, जोशपूर्ण संगीत आणि कैलाश खेर यांचा भावगर्भित आवाज ही या थीम साँगची वैशिष्ट्ये ठरत आहेत.

सूर्यनमस्कारातील मुद्रा, रंगबेरंगी भिंती, उड्डाणपूलावर रोषणाई

६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातील उड्डाणपूलावरील दिव्यांवर तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण झाले आहे. रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकावर सूर्यनमस्कारातील मुद्रा दर्शविणाऱ्या शिल्पाकृती बसविण्यात आल्या आहेत. रंगबेरंगी चित्रांनी भिंती रंगविण्यात आल्या आहेत. जणू काही दिवाळी असल्यासारखे चंद्रपूर शहर सजविण्यात आले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

Mon Dec 25 , 2023
नागपूर :- माजी प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त (करमणूक कर) चंद्रभान पराते यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com