मुंबई : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीची भरतीसंदर्भात प्राप्त तक्रारींची दखल घेवून चौकशी करण्यात येईल अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत दिली.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये गैरप्रकल्पग्रस्तांची फेब्रुवारी महिन्यात प्रशिक्षणार्थी म्हणून भरती झाली असून याबाबत चौकशी करण्यात यावी अशी लक्षवेधी विधानसभा सदस्य सुभाष धोटे यांनी सभागृहात मांडली. यावेळी लक्षवेधीच्या चर्चेत विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर यांनी भाग घेतला.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीची कुठलीही तुकडी फेब्रुवारी महिन्यात सुरू केलेली नाही.तसेच जिल्हा पुनर्वसन अधिका-यांव्दारे देण्यात येणा-या प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्रांची संपूर्ण पडताळणी करण्यात येवून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जर कुठे अवैधरित्या दिले गेले असतील तर तपासणी करू, यामध्ये जर कोठे गैरप्रकार आढळला तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच सध्या प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीची निवड प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्याच्या दृष्टीने चंद्रपूर पुनर्वसन अधिकारी यांचेमार्फत शासनाच्या विहित पध्दतीचा अवंलब करीत १२८ उमेदवारांची तात्पुरती यादी तयार करून ३ नोव्हेंबर २०२१ रोजी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली. यावर कोणीही आक्षेप नोंदवलेला नाही परंतु नोंदणीकृत प्रकल्पग्रस्त उमेदवारांव्यतिरिक्त इतर चार व्यक्तींनी नोंदविलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमली आहे याबाबत फेर तपासणीची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे या १२८ उमेदवारांच्या तात्पुरत्या यादीस अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही, तसेच यादीची पडताळणी करण्याची कार्यवाही मुख्य अभियंता महाऔिष्णिक विद्युत निर्मिती केंद्र चंद्रपूर यांच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.