संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
• महाल घटनेबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
• शांतता व सुव्यवस्थेबाबत तडजोड नाही
नागपूर :- शांतताप्रिय नागपुरातील महाल परिसरात सोमवारी घडलेली हिंसाचाराची घटना दुर्भाग्यपूर्ण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. तथापि, विरोधकांनी या घटनेचे राजकारण न करता समाजकंटकाना शोधण्यासाठी मदत करायला पाहिजे असे आवाहन महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेतल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांना सांगितले की, पोलिसांनी पुढाकार घेऊन परिस्थिती हाताळली आहे. ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ३४ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून ५० ते ५५ वाहन जाळण्यात आली आहे.
महाराष्ट्रात अशा घटना घडणार नाही यासाठी सरकार काम करत आहे.
पोलीस या घटनेचे मूळ शोधून काढतील. मात्र, ही घटना ठरवून घडली का यावर बोलता येणार नाही. पोलीस तपास करत असून सोशल मीडिया, सीडीआर, कॉल चेक करतील. घटनेमागे कोण आहेत हे शोधून काढतील. समाजकंटकाना शोधण्यासाठी नागरिकांनी मदत करायला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारांच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
समाज माध्यम अकाउंटच्या माध्यमातून दोन समाजात द्वेष निर्माण करण्यात आला त्यातून ही घटना घडली आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचे आवाहन केले आहे. घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे, त्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, याबाबत पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर घटनेवर बोलता येईल असेही बावनकुळे यांनी सांगितले.
राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दुपारी वर्धमान नगरातील न्यू इरा हॉस्पिटल येथे भेट दिली. यावेळी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. कदम यांच्या हातावर कुणीतरी समाजकंटकाने कुऱ्हाड मारली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी मला दिली .घटना मोठी गंभीर होती मात्र, ती थोडक्यात टळली असल्याचे त्यांनी सांगितले.