मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित

– राज्यपालांच्या हस्ते आदिती तटकरे, उदय सामंत, उद्योजक संजीव बजाज यांसह १७ लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सन्मानित

– विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

मुंबई :- विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक महत्वाचे असून त्यासाठी राज्याला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविणे आवश्यक आहे. नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वाढवण बंदर राज्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार असून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्यामुळे झपाट्याने वाढेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार २०२५ राजभवन, मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. त्या तुलनेत मराठी भाषेला लवकर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, याबद्दल राज्यपालांनी केंद्र शासनाचे आभार मानले. लोकांनी राज्याच्या समृद्ध साहित्य व सांस्कृतिक वारशाचे महत्व समजावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वृत्तपत्रांनी आर्थिक विकास विषयक लेख व बातम्यांना देखील महत्व द्यावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. आर्थिक संपन्नता निर्माण झाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होईल व गोरगरिबांचे कल्याण होईल असे राज्यपालांनी नमूद केले.

लोकमतने दिलेला पुरस्कार हा आपल्या कुटुंबाकडून मिळालेला सन्मान आहे असे सांगून पुरस्कारामुळे पुढे देखील अधिक चांगले काम करण्यास प्रेरणा मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना सामाजिक सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यपालांच्या हस्ते बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, बॅप्स स्वामीनारायण संस्थेचे ब्रह्मविहारी स्वामी, अभिनेता कार्तिक आर्यन आणि मुंबईचे विशेष आयुक्त देवेन भारती यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर सिंह, मुंबई पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम, बीड येथील शिक्षक संदीप पवार, नाशिक येथील कृषीतज्ज्ञ शिवाजीराव डोळे, बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी, बालरोग तज्ज्ञ डॉ. जुई मांडके, शासकीय दंत महाविद्यालयाचे डॉ. सचिन खत्री, उद्योगपती असा सिंह, दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन यांना देखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

राज्यपालांनी ग्रॅस्पर ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक ध्वनिल शेठ तसेच सह-संस्थापक देवांशी केजरीवाल यांचाही सत्कार केला.

कार्यक्रमाला लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी मंत्री जयंत पाटील तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित व पुरस्कार विजेते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत 'सुरक्षित व समृद्ध महाराष्ट्र निर्माण करणार'- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thu Mar 20 , 2025
• अर्थसंकल्पातील गृह विभागाच्या तरतुदींवर चर्चेला विधानसभेत उत्तर मुंबई :- महाराष्ट्र स्थैर्य असलेले तसेच प्रगतशील राज्य असून शांतता आणि सौहार्दतेसाठी ओळखले जाणारे आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला कुणीही गालबोट लावल्यास शासन कठोर कारवाई करेल. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत ‘ सुरक्षित व समृद्ध महाराष्ट्र’ करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्पातील गृह विभागावरील मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!