विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी महोत्सव – सुनील कुमार
आरजे पल्लवीची मुलामुलींशी हितगुज
गोंधळ व भारुड सादर
नागपूर : नृत्य व संगीताच्या गजरात महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डब्ल्यु. सी. एलचे क्षेत्रीय महाप्रबंधक सुनीलकुमार होते तर केअर हॉस्पीटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अखील जैन, पोलीस निरिक्षक विजय माहूरकर, रेड एफ.एम.चे कार्यक्रम व्यवस्थापक आनंद मस्के, आर.जे पल्लवी, श्री. अमन, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी करुणा महिला वसतिगृहाच्या मुलींनी स्वागत गीताद्वारे उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी आई भवानी तुझ्या कृपेने पावशी भक्तांना….. हे गोंधळ व दार उघड-दार उघड…. या भारुडाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. आर.जे. पल्लवी यांच्या समाजापासून दुर्लक्षित मुले व मुलींच्या शाळेतील मुलेमुलींशी त्यांचे जवळ जावून संवाद साधला. आपल्या आरजे स्टाईलने त्यांनी विद्यार्थ्यांची मने सुखावून घेतली. मुलांना भविष्यात काय होणार असे विचारताच शिवाने शास्त्रज्ञ होणार असे सांगितले तर प्रतिक्षाने कलेक्टर होणार तर रोशनीने शिक्षक होणार असे सांगितले. या मुलांच्या सुप्तगुणांना हेरुन त्यांना बोलवते केले. उपस्थितांची मने यावेळी भरुन आली.
अशा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास होतो. येथील मुले व मुली कठीण जीवनातून वेळ काढून खेळाप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपले उज्ज्वल भविष्य घडवित आहेत. महिला व बाल विकास विभाग समाजसेवेचे एक लक्ष्य गाठून काम करीत आहे ही अभिनंदनीय बाब असल्याचे मत डब्ल्यू.सी. एलचे क्षेत्रीय महाप्रबंधक सुनील कुमार यांनी येथे व्यक्त केले.
वंचितांना त्यांच्या अधिकाराची जाण मुलांना या विभागाने करुन दिली असून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. सावनेर येथील कोळसा खाणीत येथील 30 मुलांना पाहणीसाठी भोजनखर्चासह नेण्यात येईल व त्यांना तेथील कार्यपध्दतीबाबत अवगत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस निरिक्षक विजय माहूलकर यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियामाची माहिती दिली तर अखील जैन यांनी खेळाचे निरोगी आरोग्याशी कसा सबंध आहे,या विषयी मार्गदर्शन केले. एफ.एम.चे कार्यक्रम व्यवस्थापक आनंद मस्के, आर.जे पल्लवी यांनी स्वास्थ नागरिक देशाच्या विकासाचा आधार असल्याचे सांगून संगीताचे जीवनात अनन्य साधारण महत्व असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात विभागीय उपसंचालक अपर्णा कोल्हे यांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्याची माहिती दिली. कोरोना काळातील अनाथ बालकांना राजय सरकारद्वारे पाच लक्ष तर केंद्र सरकारद्वारे दहा लक्ष रुपयांची मदत दिल्याचे सांगून महिलांसाठी वसतिगृह, सखी वन स्टॉप सेंटर आदींसह विविध योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात चाचा नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन करण्यात आली. क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते कॅरमद्वारे करण्यात आला. संचालन कविता इखार यांनी केले तर उपस्थितांचे आभार वसतिगृहाचे अधीक्षक विनोद दाभेराव यांनी मानले. या कार्यक्रमास विभागातील शासकीय व अशासकीय संस्थांच्या शाळाचे मुले-मुली तसेच अधिकारी व कर्मचारी, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.