संविधान उद्देशिका अशोक स्तंभाचे लोकार्पण
नागपूर – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. या संविधानाच्या चारही स्तंभाला धक्का लावण्याचे काम केंद्रातील सरकार करीत असल्याचा आरोप राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला.
बेझनबाग येथील मैत्री बुद्ध विहारात उभारण्यात आलेल्या संविधान उद्देशिका अशोक स्तंभाचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भदंत आर्य नागार्जून सूरई ससाई हे होते. नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, नागपूर मनपाचे माजी जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, आर्की. उदय दत्त गजभिये, गोपाल बडोले प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी डॉ. राऊत म्हणाले, राज्यघटनेने दिलेल्या कर्तव्य अधिकाराची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी केले. गेल्या ७० वर्षांत आपल्या जीवनात केवळ संविधानामुळे बदल घडून आला असल्याचे त्यांनी सांगितले.
संविधानाचे आपल्या जीवनातील महत्व लक्षात घेता, “सबको मिले ज्ञान, हर घर मे संविधान” ही चळवळ राबविण्याची गरज आहे. अशोक कोल्हटकर यांनी पुढाकार घेऊन मैत्री बुद्ध विहारात संविधान उद्देशिका अशोक स्तंभ उभारून आणि भिक्खुंसाठी राहण्याची सुविधा निर्माण करून समाजापुढे उत्तम आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळराव बडोले यांनी केले.
प्रत्येक बुद्ध विहारात संविधान प्रास्ताविका दान करण्याची आणि अशोक स्तंभ उभारण्याची चळवळ राबविण्यात यावी, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले.
बेझनबाग येथील बी.सी. खदान ले- आऊट परिसरातील रहिवाशांच्या राहत्या घरांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला तरीही मी तुमच्या मदतीला कधीही धावून येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अशोक कोल्हटकर यांनी तर आभारप्रदर्शन अल्का लाडे यांनी केले.
याप्रसंगी डॉ अनमोल टेंभुर्ण, धीरज कडबे, पमिता कोल्हटकर, संगीता पाटील, रजनी कडबे, मिलिंद उंदीरवाडे, अजय वाघमारे, अनिल पाटील, राजेंद्र जनबंधू, राकेश मोटघरे, ममता गेडाम, सिद्धार्थ कडवे, प्रमोद राऊत आदी उपस्थित होते.