नागपूर :- मराठी भाषिक असून साधारणतः महाराष्ट्रापासून आपण दूर दिल्लीसारख्या परराज्यात शिक्षण आणि त्यानंतर काही दशके नोकरी करत कार्यभाग सांभाळत असाल तर आपण मराठी साहित्य तोंडी लावण्यापुरते फार तर वाचत असाल, हे सामान्य गृहीतक असते. तथापि, अशा गृहीतकांना विशेष अपवाद ठरणाऱ्या काही व्यक्ती दिल्लीत स्थायिक आहेत. त्यातील एक झळझळीत नाव म्हणजे लेखिका, अनुवादक, व्याख्यात्या, व्यवस्थापनतज्ज्ञ, ‘यू-ट्यूबर’- अर्चना मिरजकर.
अर्चना मिरजकर यांचा जन्म पुणे येथे 1969 साली झाला. मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळवली. वर्ष 1979 साली त्यांनी दिल्लीसाठी प्रवासाची सुरूवात केली आणि तेव्हापासून दिल्लीतच स्थायिक आहेत. मिरजकर यांनी केवळ मराठी वाचन सुरु ठेवले असे नाही तर वैचारिक लिखाणासोबत मराठी साहित्यात स्वतःची नाममुद्रा निर्माण केली. अपार परिश्रमाशिवाय, आणि आंतरिक प्रेरणेशिवाय हे करणे सोपे नसते. त्यांची मराठी आणि इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध आहेत, त्यात साहित्याच्या विविध विधा त्यांनी हाताळल्या आहेत.
मिरजकरांची काही प्रकाशित पुस्तके – ‘स्वयंसिध्दा’ हा ‘मनोविकास’ने प्रकाशित केलेला कथासंग्रह महाभारतातील स्त्री पात्रांचं हृद्गत मांडणारा आहे. ‘ऑल द वे होम’ ही ‘लिफी’ने प्रकाशित केलेली इंग्रजी कादंबरी एक अफाट ‘सायन्स-फिक्शन’ आहे. ‘हॅलो, कोण? ‘हे दोन अंकी नाटक, ‘नदीकाठी वाळवंटी’ हा लघुकथा संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी इंग्रजीतून व हिंदीतून मराठीत अनुवाद देखील केले आहेत. ‘शकुंतला’, ‘अर्धीमुर्धी कहाणी’, ‘छिन्नमस्ता’, ‘मातीची माणसे’ यासोबत त्या नियमित नियतकालिकांतून स्तंभलेखन करत असतात. याशिवाय कॅनडाच्या भारतीय दूतावासात त्या संचार-विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
मागील काही वर्षांपासून तर त्यांनी ‘ग्रंथयात्रा’ नावाचा जो उपक्रम सुरू केला आहे, त्यात त्यांनी ‘न भूतो न भविष्यति’ असे काम करून ठेवले आहे, ते ही ‘डिजिटल’ माध्यमाला, ‘यू ट्यूब’ साहाय्यकर बनवून.
मराठी साहित्यात मैलदगड ठरलेले एकेक मराठी पुस्तक वाचायचे, त्याचा अर्क काढायचा, मराठीत आणि इंग्रजीत त्यावर परीक्षणात्मक लिखाण करायचे आणि मग त्या त्या विषयाशी संबंधित व्यक्तींना निवडून त्यांना त्या पुस्तकासंबंधी बोलते करायचे. हे सगळे एका छान ‘यू ट्यूब’ व्हिडिओत स्वतःच रेकॉर्ड करून नंतर प्रसारित करायचे. असा एकेक नेटका भाग त्यांनी प्रसारित करायला सुरुवात केली, असे करता करता त्यांनी तब्बल शंभर मराठी पुस्तकांचा वेध घेतला.
त्यांनी आपल्या यात्रेत ज्या पुस्तकांचा सखोल आढावा घेतला आहे, त्यांची यादी – श्री ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र, नामदेवांची अभंगवाणी, जनाबाईंची अभंगवाणी, भावार्थ रामायण, श्री तुकाराम गाथा, श्री दासबोध, दमयंती स्वयंवर, हरिविजय, श्लोककेकावली, पैंजण, भाऊसाहेबांची बखर, संगीत सौभद्र, केशवसुतांची कविता, पण लक्ष्यांत कोण घेतो?, किचकवध, बालकवींची कविता, संगीत शारदा, एकच प्याला, तांबे यांची कविता,आश्रम हरिणी, झेंडूची फुले, माझी जन्मठेप, दौलत, ब्राह्मणकन्या, कळ्यांचे निःश्वास, श्यामची आई, साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी, रणांगण, विशाखा, माणदेशी माणसे, बळी, मर्ढेकरांची कविता, बहिणाबाई चौधरींच्या कविता, गारंबीचा बापू , मृद्गंध, गीत रामायण, ऋतुचक्र, तुझे आहे तुजपाशी, यात्रिक, कुणा एकाची भ्रमणगाथा, गाडगीळांच्या कथा, ययाती, धग, बोरकरांची कविता, अपूर्वाई, देव चालले, दशपदी, सांगाती, स्वप्नजा, स्वामी, रायगडाला जेव्हा जाग येते, निवडक पु भा भावे, सावित्री, सलाम, चक्र, कोसला, रंगबावरी, वाहतो ही दुर्वांची जुडी, असा मी असा मी, आठवणींचे पक्षी, डोह, माझे विद्यापीठ, दुसरा पक्षी, कोंडूरा, एक शून्य बाजीराव, संध्याकाळच्या कविता, मृत्युंजय, शांतता कोर्ट चालू आहे, रानातल्या कविता, घरगंगेच्या काठी, ऑर्फियस, मरण स्वस्त होत आहे, काळे बेट लाल बत्ती, दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, युगान्त, राऊ, आनंदी गोपाळ, गोलपीठा, काजळमाया, नक्षत्रांचे देणे, थँक्यू मिस्टर ग्लाड, गोंदण, उत्थानगुंफा, अरुण कोलटकरच्या कविता, वामन परत न आला, बलुतं, तळ्यातल्या सावल्या, एक होता कार्व्हर, एकेक पान गळावया, घर हरवलेली माणसे, एल्गार, चौंडकं, स्त्रीसूक्त, झाडाझडती, गहिरे पाणी, चित्रलिपि, मारवा, आरपार लयीत प्राणांतिक, अशी वेळ, उद्या.
प्रामुख्याने येथे नमूद करावेसे वाटते की, हे फार मोठे काम महाराष्ट्रापासून दूर राहून पूर्ण झाले आहे. अविश्वसनीय वाटावे असे हे काम पूर्णत्वाला नेल्याबद्दल अर्चना मिरकार यांचे मनापासून अभिनंदन ! या कामी त्यांना त्यांचे वडील, प्रसिद्ध विचारवंत, लेखक आणि कवी डॉ. निशिकांत मिरजकर, जे पूर्वी दिल्ली विद्यापीठात मराठी भाषा विभाग प्रमुख होते व त्यांच्या आईचे, डॉ. ललिता मिरजकर (माजी प्राध्यापक, दिल्ली विद्यापीठ) मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे पती श्री अनुपम कुमार यांनी डिजिटल रेकॉर्डिंग व एडिटिंग मध्ये सहकार्य केले. पारिवारिक सहकार्याशिवाय असे मोठे उपक्रम साध्य होत नाहीत, हेच खरे. तसेच या उपक्रमात पासष्ट तज्ज्ञ – लेखक, साहित्यिक, प्राध्यापक, प्रसिद्ध गायक यांचा समावेश आहे. सर्वसमावेशकतेमुळे ही मराठी साहित्यात मैलदगड ठरलेल्या पुस्तकांना समाजमाध्यमांच्या देखील सोबतीने व्यापक बनविण्याची नाविन्यपूर्ण सुरुवात आहे, मराठी भाषेत असे यशस्वी प्रयोग होत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे.
समाजमाध्यमांचा आपण कसा मराठी भाषा संवर्धनासाठी सकारात्मक वापर करू शकतो, याचे हा उपक्रम म्हणजे एक निकष आहे. जगाच्या पाठीवर बारा कोटी मराठी भाषिक लोक वास्तव्यास आहेत, त्यांच्यापर्यंत हा उपक्रम आणि त्या निमित्ताने ज्या पुस्तकांचा ऊहापोह करण्यात आला ती शंभर पुस्तके पोचतील, अशी आपण अपेक्षा करूया. अर्चना मिरजकरांना त्यांच्या ‘ग्रंथयात्रा’च्या शतकोत्तर व आगामी उपक्रमांसाठी शुभेच्छा !
‘ग्रंथयात्रा’चे भाग खालील लिंक वर उपलब्ध आहेत –
https://youtube.com/@Granthyatra?si=VbqYVefSohahWDHK