नागपूर :- हुतात्मादिनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगतेच्या औचित्याने आज ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाची सुरुवात झाली आहे. भूमातेला वंदन तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज हुतात्मादिनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘पंचप्रण शपथ’ दिली.
‘भारतास वर्ष २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करतांनाच गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करून देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, तसेच नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू….’अशी शपथ बिदरी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. यावेळी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती सन्मान म्हणून हातात ज्योत घेवून ही शपथ घेण्यात आली. महसूल उपायुक्त दिपाली मोतियेळे, रोहयो उपायुक्त राजलक्ष्मी शहा, उपायुक्त सर्वश्री प्रदीप कुळकर्णी, धनंज सुटे, रमेश आडे, डॉ.कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे, घनश्याम भूगावकर, चंद्रभान पराते, इंदिरा चौधरी आदी अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर आयोजित विविध उपक्रमांच्या समारोपीय उपक्रमांतर्गत नागपूर विभागातील सर्व ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत शिलाफलक, वसुधावंदन अंतर्गत ७५ देशी वृक्षांची लागवड करून अमृतसरोवर वाटिकांच्या परिसरात ध्वजारोहण, स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन आदी उपक्रमाचीही सुरुवात झाली आहे. यात विभागातील सर्व नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होण्याचे आवाहन बिदरी यांनी यावेळी केले.
नागपूर विभागातील ३ हजार ६५६ ग्रामपंचायतींमध्ये ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार आहेत. या वाटिकांमध्ये सुमारे २ लाख ७४ हजार २०० देशी वृक्षांची लागवड करण्यात येईल. त्यासोबत स्वातंत्र्य सैनिक व देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक उभारण्यात येणार आहेत. अमृत सरोवर येथील माती गोळा करून सन्मानपूर्वक तालुका स्तरावर एकत्र करण्यात येईल व ही माती असलेला ‘अमृत कलश’ राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी नागपूर विभागातील तालुक्यांतून निवड करण्यात आलेल्या एकूण ६३ युवकांमार्फत पाठविण्यात येईल. ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम दिनांक ९ ते ३० ऑगस्ट दरम्यान साजरा होत आहे.