आरोग्य यंत्रणांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
भंडारा : दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमीक्रोन हा कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट पेक्षाही अधिक घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर ज्या नागरिकांनी अद्यापही लसीकरण केलेले नाही. त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणांचा आढावा आज जिल्हाधिकारी यांनी घेतला. आधीचा अनुभव पाहता कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही जास्त घातक ठरली. त्या डेल्टा व्हेरियंट पेक्षा वेगाने प्रसार होणारा हा ओमीक्रोन व्हेरियंट घातक सिद्ध होऊ शकतो. कोरोना गेला आहे किंवा कमी झाला आहे, असे समजून अनेक नागरिक निर्धास्तपणे वागत आहेत. लसीकरणाचा पहिला डोस झालेले दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे. मात्र ओमीक्रोनचा वाढता धोका पाहता लसीकरण हाच उपाय त्याची तीव्रता कमी करू शकतो.
कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात घटती असली ही समाधानाची बाब आहे तरी यामुळे नागरिक जरा निर्धास्त झालेले दिसतात. तसेच कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन सुद्धा काही ठिकाणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र आता नागरिकांनी गाफील न राहता कोविड अनुरूप वर्तन ठेवावे. तसेच सातत्याने त्रिसूत्री नुसार मास्क वापरणे, हात धुणे आणि शारीरिक अंतर राखणे याचा आपल्या दैनंदिन जीवन व्यवहारांमध्ये वापर करावा. दरम्यान आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा आढावा घेतला. तरी नव्या व्हेरियंटचा धोका पाहता नागरिकांनी आपले लसीकरण वेळेत करून घ्यावे, असे तळमळीचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.