भंडारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पशुधन उपलब्ध असून दुग्ध निर्मीती हा रोजगार आहे. विविध आजारांपासून पशुधनाचे रक्षण करण्यासाठी पशुपालकांनी पशुंना लाळ-खुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत लाळ-खुरकत रोगप्रतिबंधक लसीकरणाची तिसरी फेरी 31 जानेवारी 2023 पर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज जिल्हा सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेला जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.एस.वंजपारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुशील भगत, जिल्हा सहकारी उपनिबंधक अतुल वानखेडे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अन्नू वरारकर उपस्थित होते.
2020 च्या पशुगणने नुसार जिल्ह्यात 2 लाख 13 हजार 36 गाय वर्ग व 1 लाख 6 हजार 861 म्हैस वर्ग अशी एकूण 3 लाख 19 हजार 897 गोवंशीय जनावरे आहेत. जिल्ह्यात लाळ-खुरकत रोग नियंत्रणासाठी 2 लाख 71 हजार लसमात्रा प्राप्त झाल्या असून एकूण 88 पशुवैधकीय संस्थेमार्फत 31 जानेवारी 2023 पर्यंत लसीकरणाचे कार्य करण्यात येणार आहे.
लाळ-खुरकत रोग हा विषाणुजन्य संसर्गजन्य असून एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना सहज लागत होते. या रोगाला तोंडखुरी, पायखुरी असे म्हणतात. या आजारात तोंडात जिभेवर व खुरात जखमा होतात. तोंडाद्वारे लाळ गळणे, लंगडणे, ताप येणे, धाप लागणे, चारा पाणी कमी खाणे बंद होणे आदी लक्षणामुळे जनावरे अशक्त होतात. वेळीच योग्य काळजी घेतली नसल्यास प्रसंगी जनावरे दगावतात. जिल्ह्यातील सर्व गोपालकांनी आपल्या नजीकच्या पशुवैधकीय संस्थेकडून लाळ-खुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण करून घेण्यात यावे. तसेच बाजार समित्यांनी जनावरांची खरेदी व विक्री टागींग व लसीकरण करूनच करावी, असे स्पष्ट निर्देश कुंभेजकर यांनी दिले.