यवतमाळ :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र परंतू आधार प्रमाणिकरणापूर्वीच निधन झालेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ अदा करता आला नाही. अशा शेतकऱ्यांच्या वारसांनी संबंधित बँकेत कागदपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लाभासाठी पात्र असलेल्या मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत महाआयटीकडून आदर्श कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवरून काढून टाकण्याची सुविधा दि.९ सप्टेंबर ते दि.१७ सप्टेंबर या कालावधीत बँकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद संबंधित कर्जखात्यास करुन त्याबाबतची माहिती संगणकीय प्रणालीवर सादर करण्याची सुविधा दि.१८ सप्टेंबर ते दि.२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. तथापी प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये पात्र ठरलेल्या मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रे संबंधित बँकेकडे विहीत कालावधीमध्ये जमा करणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण केलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखांशी संपर्क साधून दि.१८ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरण पुर्ण करुन घेण्यात यावे, असे आवाहन सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.