नागपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील विविध योजनांची माहिती होण्यासाठी तसेच कृषी विद्यापीठ व कृषी संशोधन केंद्र यांच्यामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होणेसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा यांचे समन्वयाने दि. 4 ते 8 जानेवारी या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शेतक-यांना ग्राहकांसाठी थेट विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे. याचे औचित्य साधून PMFME योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थाच्या अन्न प्रक्रिया उत्पादनांची ओळख जिल्ह्यातील इतर खरेदीदार व ग्राहक यांना होण्यासाठी तसेच त्यांचे उत्पादनांना बाजरपेठ उपलब्ध होण्याकरिता कृषी पदव्युत्तर सभागृह, बजाज नगर, नागपूर येथे 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता खरेदीदार-विक्रेता संमेलन घेण्यात येणार आहे. त्याचा लाभ अन्न प्रक्रिया उत्पादकांसह विविध खरेदीदारांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत जिल्ह्यातील सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देवून त्यांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) सन 2020-21 पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना भांडवली गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा, मार्केटींग व ब्रान्डींग, बीज भांडवल या माध्यमातून अनुदानाचा लाभ देण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या वैयक्तिक लाभार्थ्यांच्या 136 भांडवली गुंतवणूकीच्या प्रकल्पांना 254 लाख अनुदान मंजूर झालेले आहे. याचे माध्यमातून जिल्ह्यामध्ये ९०४ लाखांची गुंतवणूक झालेली आहे.
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक, खरेदीदार व विक्रेत्यांमध्ये परस्पर विश्वास, उत्पादनांबद्दल जाणीव, Memorandum of Understanding (MoU) च्या माध्यमातून व्यवसायिक हितसंबंध निर्माण करुन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या उत्पादनांना विक्रीसाठी नवीन संधी उपलब्ध होणे हा खरेदीदार-विक्रेता संमेलनाचा (Buyer-Seller meet) मुख्य उद्देश आहे. यानुषंगाने विक्रेत्यांची उत्पादने थेट खरेदीदारांसाठी प्रदर्शित करण्यास मदत होणार असून खरेदीदार व विक्रेते यांना खुली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तरी खरेदीदार-विक्रेता संमेलनाचा लाभ जास्तीत जास्त खरेदीदारांनी व PMFME योजनेंतर्गत लाभार्थी विक्रेत्यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, नागपूर यांचेशी 8879485570 या क्रमांकावर संपर्क साधावा.
@फाईल फोटो