नागपूर :- खरीप हंगामामध्ये बियाणे खरेदी करतांना बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची अंतिम मुदत पाहुनच खरेदी करा. तसेच खरेदी केलेल्या बियाणांचे वेस्टन, पीशवी , टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापनी होईपर्यंत जपून ठेवा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक एस. एम. तोटावार यांनी केले आहे.
खरीप हंगामामध्ये बियाणे खरेदी करतांना गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य देतानांच विना पावतीने कोणतेही निविष्का खरेदी करु नये असे आवाहन करतांना विभागीय कृषी सहसंचालक यांनी कमी वजनाच्या निविष्का तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा. तक्रारी संदर्भात कृषी विभागाच्या दूरध्वनी, इ-मेल अथवा एसएमएसचा वापर करुन शासनाच्या गतीमान गुण नियंत्रण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
कापूस बियाणे व पिकांच्या संदर्भात तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच भेसळ असल्यास, बियाणे उगवण्याची तक्रार असल्यास उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत केली आहे. शेतकऱ्यांनी या संदर्भात पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात लेखी तक्रार नोंदविण्याचे सुविधा असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक एस. एम. तोटावार यांनी दिली.