वाचनातून स्वत:ला घडवा – पद्मश्री, डॉ.परशुराम खुणे

गडचिरोली जिल्हा ग्रंथोत्सव 2023 ला सुरूवात

गडचिरोली : विद्यार्थीदशेतच वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे असून वाचनातून स्वत:ला बदलता येते, स्वत:च्या जीवनाला घडवता येते असे प्रतिपादन पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांनी केले. गडचिरोली जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन त्यांचे हस्ते संपन्न झाले. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व शिक्षण विभाग माध्यमिक, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद हायस्कुल, गडचिरोली येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनीय भाषणात डॉ.खुणे बोलत होते, ते म्हणाले श्री संत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर तसेच संत तुकारात कोणत्याही मोठ्या विद्यापीठात शिकले नसताना आज आपल्याला मौल्यवान विचार देवून गेले. असे अनेक मोठे कतृत्ववान व्यक्ती आहेत की, त्यांनी त्यांचे व इतरांचे विचार वाचून आपल्या जीवनात बदल केले व ते यशस्वी झाले. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानून आपण हा पुरस्कार झाडीपट्टीतील रसिकांना समर्पित करत असल्याचे सांगितले. वाचनाबरोबरच सर्वांनी माणसांचा अभ्यास करायला शिकले पाहिजे. वाचनातून विविध विचार आत्मसात करून आपल्यातील चांगला कलाकार साकारा असेही त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जगदिश म्हस्के, साहित्यीक वसंत कुलसंगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक राजकुमार निकम, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रामदास साठे, प्रा.मनिष शेटे व नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकामधे राजकुमार निकम यांनी ग्रंथोत्सवाचे महत्त्व सांगून माणसाची विचारधारा वाचनातून निर्माण होत असल्याबाबत विविध विचारवंतांची उदाहरणे सांगितली. गडचिरोली येथे ग्रंथ दिंडी, विक्री व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. यानंतर सचिन अडसूळ यांनी वाचनाचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले. ते म्हणाले, आज मुलांना एवढे स्वातंत्र मिळाले आहे की, मोबाईल, चित्रपट व दूरचित्रवाणीच्या माध्यमातून ते आपले विचार मांडत असतात. खरेतर त्यांनी वाचनातून स्वत:चे विचार वृद्धींगत करायला हवेत. अध्यक्षीय भाषणात भाऊराव पत्रे यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानून वाचाल तर वाचाल यातून वाचनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे आभार जगदिश म्हस्के यांनी मानले तर सुत्रसंचलन संध्या येरेकर यांनी केले.

ग्रंथ दिंडीला प्रचंड प्रतिसाद : ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनापुर्वी गडचिरोली शहरात ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील शिवाजी हायस्कुल, वसंत विद्यालय, नवजीवन, स्कुल ऑफ स्कॉलर्स, प्लॅटीनम, कारमेल, शिवकृपा, भगवंतराव हिंदी हास्कुल, जिल्हा कॉम्प्लेक्स, गोंडवाना सैनिकी, प्रज्ञा, रानी दुर्गावती, संत गाडगेबाबा आदी शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी संत, महात्मे तसेच विविध विचारवंताच्या वेशभुषेत दिंडीत सहभाग घेतला होता. यावेळी नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जगदिश म्हस्के, शिक्षणाधिकारी माध्यमिक राजकुमार निकम, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रामदास साठे, प्रा.शेटे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रंथोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन – दुपारी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामधे नवे ऑनलाईन तंत्रज्ञान समाजमाध्यम युवा पिढीसाठी घातक की सहायक या विषयावर ग्रामगीताचार्य जेष्ठ साहित्यीक प्रा.बंडोपंत बोढेकर, प्राध्यापक गोंडवाना विद्यापीठ डॉ.सविता सादमवार, प्रा. मनिष शेटे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यकमाचे आयोजन केले होते. यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक राजकुमार निकम, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रामदास साठे, प्रा.शेटे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमातून आपली कला सादर केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा - आर.आर. पाटील

Wed Feb 8 , 2023
11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्यावतीने दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय,गडचिरोली तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!