नागपूर :- राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये सादर केलेला अर्थसंकल्प अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय घटकांच्या कल्याणाचा मार्ग अधिक सुकर करणारा असल्याची प्रतिक्रीया भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली आहे.
‘बार्टी’ अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी ‘अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था’ अर्थात ‘आर्ती’ ची स्थापना करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा मातंग समाजासाठी महत्वाचा आणि ऐतिहासिक आहे. याशिवाय अनुसूचित जाती-जमातीच्या निराधार महिलांकरिता राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या राशीमध्ये १ हजारावरून १५०० एवढी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेच्या लाभार्थी असलेल्या निराधार महिलांसाठी हा अत्यंत लाभदाय निर्णय असल्याचेही ॲड. मेश्राम म्हणाले.
चर्मकार समाजबांधवांच्या व्यवसायाला सन्मान देणारा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे देखील त्यांनी नमूद केले. संत रोहिदास चर्मद्योग आणि चर्मकार विकास महामंडळा अंतर्गत देवणार येथे लेदर पार्क, कोल्हापूर येथे लेदर इंडस्ट्री ट्रेनिंग सेंटर ची स्थापना ही चर्मकार समाजाच्या व्यवसायाला बळकटी देणारी आहे, असेही ते म्हणाले.
महिला, शेतकरी यांच्या कल्याणासाठी देखील अनेक महत्वाच्या योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत. युवकांच्या रोजगारासाठी देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारखे महत्वपूर्ण पुढाकार हे महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी उचललेले महत्वाचे पाउल असल्याचेही ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.