– संत्र्याला लागली गळती ; निम्म्यापेक्षाही कमी संत्री झाडावर शिल्लक !
मोर्शी :- नागपुरी संत्री असं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांना या भागातील संत्रा फळाबद्दल आकर्षक वाटते. परंतु हा संत्रा पिकवणारा शेतकरी मात्र सलग सातव्या वर्षी मेटाकुटीला आला आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे संत्राबागांना लागलेली गळती. मागील दोन महिन्यांपासून अति पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हलाखीच्या परिस्थितीमध्ये सापडला आहे. सुरुवातीला हजारो संत्रा फळांनी बहरलेल्या संत्रा झाडावर मात्र आता निम्यापेक्षाही कमी संत्रा शिल्लक असल्याचे पहायला मिळत आहे.
मोर्शी वरूड तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्रा उत्पादक शेतकरी संत्रा गळतीमुळे संकटात आला असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे होत असतांना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असून सुद्धा केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे व कृषी विभागाचे उदासीन धोरण जबाबदार ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे.
केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था – सीसीआरआयने तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी एक उत्प्रेरक (कॅटलिस्ट) म्हणून काम करायला पाहिजे. या संस्थेमधील उत्तम तंत्रज्ञान कृषी क्षेत्राच्या गुणात्मक वृद्धीसाठी कामी आलं पाहिजे. संस्थेन जगातील सर्वोत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करण्यासाठी संस्थासोबत संयुक्त भागीदारी केली पाहिजे, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संशोधन केले पाहिजे, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बुरशीनाशके, कीटकनाशके, उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे उपसंचालक उज्वल आगरकर, उप विभागीय कृषी अधिकारी प्रफुल सातव यांच्याकडे रेटून धरली असून पांढरा हत्ती ठरत असलेल्या केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेला शेतकऱ्यांच्या बांधावर आणा अशी आग्रही मागणी सुद्धा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, ग्राम पंचायत सदस्य सचिन उमाळे, मंगेश होले, अतुल काकडे, संजय निमजे, गजानन निमजे, प्रदीप वानखडे, यांच्यासह शेकडो संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर !
अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संत्रा गळतीमुळे हवालदिल झाला आहे. शेतकरी महागडी औषधे वापरत असला तरी याचा काहीएक फायदा होत नाही. परिणामी आर्थिक खर्चात वाढ आणि उत्पन्न कमी अशा अवस्थेत शेतकरी अडकला असतांना केंद्रिय फळ संशोधन संस्थेचे संशोधक व कृषी विभागाच्या तज्ञांकडून, शासनाकडून अजूनही ठोस उपाय योजना होतांना दिसत नसल्यामुळे सातत्याने होणारी संत्रा गळती ही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.
– रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.