– उत्तर नागपूर भाजपचे स्नेह मिलन
नागपूर :- नागपूरमध्ये झालेला विकास सर्वसामान्य जनता डोळ्याने बघत आहे. आता समाजातील गरजूंपर्यंत सरकारी योजना पोहोचविण्याचे काम करण्याची गरज आहे. जेणेकरून नागपूरचा सर्वांगीण विकास आपल्याला साधता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
उत्तर नागपूर भाजपच्या वतीने रविवारी कार्यकर्त्यांचे स्नेहमीलन आयोजित करण्यात आले. यावेळी ना. नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जगत सेलिब्रेशन येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर नागपूरचे अध्यक्ष संजय चौधरी, माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार डॉ. मिलींद माने, ज्येष्ठ सदस्य घनश्याम कुकरेजा, प्रभाकर येवले, विकी कुकरेजा, राजेश हातीबेड यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘आपण नागपूर शहरातील रस्ते चांगले केले. पूल बांधले, मेट्रो आणली. उद्याने छान झालीत. उत्तर नागपूरचे रूपही पालटले आहे. दीक्षाभूमीचे रखडलेले कामही पूर्ण झाले. भाजपने जात, पात, धर्माचे राजकारण केले नाही आणि करायचेही नाही. आपण काम केले आहे. त्यामुळे सेवेच्या आधारावरच आपल्याला मत मागायचे आहे.
लोकांच्या घरापर्यंत जाऊन संवाद वाढवायचा आहे. कारण आज शहराचा विकास पुढे बसलेल्या कार्यकर्त्यांमुळे आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या जनतेमुळे शक्य झाला आहे.’ भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्तेच पक्षाचे मालक आहेत, असेही ते म्हणाले.