वंदे मातरम् उद्यानाचे भुमिपूजन : देशभक्तीपूर्ण वातावरणात रंगला बजेरिया परिसर
नागपूर : ‘लहु बहे तो बहे, सांस चले ना चले ,मेरा राष्ट्र चलना चाहिए, मेरा राष्ट्र बढना चाहिए..’
कारगील युद्धातील थरारक प्रसंग, युद्धसमयी नजीकच्या सहका-यांना आलेले वीमरण डोळ्याने पाहताना स्वत:ला लागलेल्या गोळ्यांच्या वेदनाही कमकुवत झालेल्या असताना केवळ देश आणि आपल्या सहका-यांची सुरक्षा जपली जावी हिच भावना ठेवून अखेरपर्यंत ‘माँ भारती’च्या संरक्षणासाठी लढा देण्याचा संकल्प केलेल्या कारगील युद्धातील हिरो परमवीरचक्र योगेंद्र सिंह यादव यांचे उपरोक्त शब्द न शब्द थेट मनात कोरले गेले. उपस्थित प्रत्येकाचे श्वास रोखले गेले अन् जेव्हा भारतीय जवानांनी टायगर हिलवर विजय पताका फडकाविल्याची आठवण त्यांनी सांगितली संपूर्ण परिसरात केवळ ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’चे जयघोष झाले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधून महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून बजेरिया येथे एम्प्रेस मॉलच्या समोरील जागेत साकारत असलेल्या भारतीय सेनेतील सर्वोच्च परमवीरचक्र पुरस्कार प्राप्त जवानांना समर्पित ‘वंदे मातरम्’ उद्यानाचे शुक्रवारी (ता.४) कारगील युद्धातील हिरो परमवीरचक्र योगेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी त्यांनी कागरील युद्धातील थरारक प्रसंग कथन केला. वंदे मातरम् उद्यानात देशातील २१ परमवीरचक्र प्राप्त जवानांचे म्यूरल आणि त्यांनी योगदान दिलेल्या युद्ध प्रसंगांचे वर्णन केले जाणार आहे.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. महापौर दयाशंकर तिवारी यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, धंतोली झोन सभापती वंदना भगत, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, भाजपा विदर्भ संगठन मंत्री उपेंद्र कोठेकर, माजी आमदार गिरीश व्यास, नगरसेवक ॲड. संजयकुमार बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, उमंग चे मेजर जनरल हुडा, कर्नल भटनागर, उपायुक्त रवींद्र भेलावे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी कारगील युद्धातील हिरो परमवीरचक्र योगेंद्र सिंह यादव आणि महापौर दयाशंकर तिवारी यांची बजेरिया परिसरात रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये नागरिकांनी पुष्पवर्षाव करीत परमवीरचक्र योगेंद्र सिंह यादव यांच्या देशाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लहानु इंगळे यांच्या मंगलदीप बँड पार्टीतर्फे नि:शुल्करित्या संपूर्ण रॅलीत संगीतमय सलामी देण्यात आली.
कारगील युद्धातील हिरो परमवीरचक्र योगेंद्र सिंह यादव यांनी कारगील युद्धातील थरारक प्रसंग उपस्थितांच्या डोळ्यापुढे उभा केला. त्यांच्याकडून वदविला जाणारा एकेक शब्द उपस्थितांच्या अंगावर शहारे निर्माण करीत देशाप्रति आदर, प्रेमाची भावना निर्माण करीत होता. क्षणाक्षणाला परिसरात केवळ देशप्रेमाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघत चालला होता. वयाच्या १९व्या वर्षी ज्या वेळी ना सेनेचे ना वयाचे अनुभव अशा काळात कारगील युद्ध लढताना केवळ देशाची सुरक्षा हिच भावना ठेवून शेवटपर्यंत लढण्याचे बळ देशाच्या मातीने दिल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणाचीही पर्वा न करणा-या परमवीरचक्र प्राप्त सैनिकांना समर्पित योद्ध्यांच्या सन्मानार्थ वंदे मातरम उद्यानाची निर्मिती ही अभिवन संकल्पना असल्याचे नमूद करीत योगेंद्र सिंह यादव यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेबद्दल त्यांचे अभिनंदन केले. देशातील २१ परमवीचक्र विजेत्या जवानांना समर्पित असलेले हे ‘वंदे मातरम्’ उद्यान एक पावन धाम आहे, असेही गौरवोद्गार परमवीरचक्र योगेंद्र सिंह यादव यांनी यावेळी काढले.
वंदे मातरम् उद्यान ठरणार बजेरियावासीसाठी प्राणावायू : ना. नितीन गडकरी
बजेरिया परिसर हा शहरातील अत्यंत गर्दीचा परिसर म्हणून ख्याती प्राप्त आहे. या परिसरात अनेक अडथळे पार करून वंदे मातरम् हे देशातील परमवीरचक्र जवानांना समर्पित उद्यानाची निर्मिती करणे ही महापौर दयाशंकर तिवारी यांची संकल्पना आणि त्यातून साकारणारे उद्यान येथील रहिवाशांसाठी प्राणवायू ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले. बजेरिया परिसरातील रहिवासी हे गर्दीच्या ठिकाणी राहतात. येथील ज्येष्ठ, चिमुकले, महिला, तरुण यांना मोकळेपणाने फिरण्यासाठी उद्यान नाही. अशा स्थितीत त्यांच्या परिसरात देशात अधोरेखीत होणारे उद्यान साकारणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या उद्यानामुळे येथील तरुणांना देशसेवेची गोडी लागेलच शिवाय येथील नागरिकांना फिरण्यासाठी, चिमुकल्यांना खेळण्यासाठी हक्काची जागा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशासाठी प्राणाची बाजी लावणा-या जवानांना समर्पित उद्यानाचे भूमिपूजन परमवीरचक्र योगेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते करण्याच्या पुढाकाराबद्दल व उद्यानाच्या संकल्पनेबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांचे ना. नितीन गडकरी यांनी अभिनंदन केले. परमवीरचक्र योगेंद्र सिंह यादव यांनी देशासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दलही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त करीत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
वंदे मातरम् उद्यान देशसेवेची प्रेरणा देणार : चंद्रकांतदादा पाटील
विपरीत परिस्थितीत देशाच्या सुरक्षेशी तडजोड न करता केवळ संघर्ष करणे, देशाच्या सुरक्षेपुढे प्राणही अर्पण करणे ही भावना जपणा-या परमवीरचक्र योगेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते वंदे मातरम् उद्यानाचे भूमिपूजन आणि त्यांच्यासारख्याच २१ परमवीरचक्रांना समर्पित असलेले हे उद्यान नागपूर शहरासह देशातील तरुणांना देशसेवेची प्रेरणा देणार, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. नवनवीन संकल्पना मांडून आपल्या शहराचा सर्वांगिण बाबीतून विकास करण्याची भावना ठेवित नवीन संकल्पना मांडून ती पूर्णत्वास नेत असल्याबद्दल त्यांनी यावेळी महापौर दयांशकर तिवारी यांचे आभारही मानले. मरण आले तरी बेहत्तर पण विजय मिळवायचाच ही परमवीरचक्र योगेंद्र सिंह यादव यांची भावना आणि अशाच भावनेतून देशासाठी लढणा-या जवानांचा त्यांनी यावेळी गौरव केला. आज देशासाठी स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता समर्पन भावनेने योगदान देणा-या जवानांमुळेच आपण सुरक्षित असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
स्वायत्त संस्थेद्वारे निर्मित देशातील एकमेव उद्यान : महापौर दयाशंकर तिवारी
प्रास्ताविकात महापौर दयाशंकर तिवारी यांनी ‘वंदे मातरम्’ उद्यानाची संकल्पना विषद केली. ते म्हणाले, ‘वंदे मातरम्’ उद्यान या परिसरात २१ परमवीर चक्र विजेत्यांची ग्लास फायबरचे म्युरल राहणार आहे. सोबतच प्रत्येकांची जीवनी तेथे लावण्यात येणार आहे. या शिवाय ज्या युध्दामध्ये त्यांनी आपले शौर्य प्रदर्शित केले त्या युध्दभुमीचे चित्रांकन सुध्दा सिरॅमिकचे म्युरल प्रतिमेच्या पार्श्वमध्ये करण्यात येणार आहे. परिसरात युध्दात वापरण्यात आलेले एक टँक, एक मिग विमान, एक तोफ हे सर्व वॉर ट्राफी म्हणून ठेवले जाणार आहे. प्रत्येक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमात हे सर्व हुतात्मे साक्षी रहावेत या उद्देशाने नागपूर शहर आणि जिल्ह्यातील शहिदांचे नाव कोरलेले २५० आसन क्षमतेचे एम्पि थिएटर उभारले जाणार आहे. उद्यानाचे प्रवेशद्वार इंडिआ गेटच्या स्वरूपात साकारले जाईल. संपूर्ण देशभरात भारतीय सेनेला समर्पित दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकरलेल्या वॉर मेमोरियल नंतर भारतीय सेनेला समर्पित स्वायत्त संस्थेद्वारे तयार करण्यात येणारे हे देशातील एकमात्र उद्यान ‘वंदे मातरम्’ उद्यान असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले. आभार नगरसेवक संजय बालपांडे यांनी मानले.