संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
-3 लक्ष रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस
कामठी ता प्र 27:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती रामेश्वर बावनकर यांच्या बंगल्याच्या बाजूला असलेल्या निर्मल उज्वल क्रेडिट को ऑप सोसायटी ली. नागपूर(मल्टिस्टट) बँकेचे माजी मॅनेजर व बँक कर्मचारी ने एका महिला खातेदाराची दिशाभूल करून विश्वासघात करीत 3 लक्ष रुपयाची आर्थिक फसवणुक केली तर हा प्रकार बँकेचे संस्थापक प्रमोद मानमोडे यांच्या निवडणुकीत लागणाऱ्या कामासाठी उपयोगात आणल्याचे कबुलीवरून पीडित फिर्यादी रामेश्वर बावनकर यांचे कार्यालयातील अकाउंटंट करुणा युवराज वासनिक वय 40 वर्षे रा रणाळा कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बँकेचे संस्थापक प्रमोद मानमोडे , बँकेचे माजी व्यवस्थापक सचिन प्रकाशराव बोंबले आणि बँक कर्मचारी शैलेश कोचनकर विरुद्ध भादवी कलम 420,409,406,467,468,471,120-Bअनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर पीडित फिर्यादी करुणा युवराज वासनिक ही आपले पती आतिष चवरे व सहा वर्षीय मूलगा आरव यांच्यासह रणाळा येथील घरात वास्तव्यास असून कुटुंबाला हातभार म्हणून रामेश्वर बावनकर यांचे शुक्रवारी बाजार परिसरात असलेल्या कार्यालयात अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे तसेच फिर्यादीचे वडील हे कोलमाइन्स सिलेवाडा येथून 2013 मध्ये नोकरीवरून सेवानिवृत्त झाल्याने घरीच वास्तव्यास आहेत.यातील आरोपी शैलेश कोचनकर व बँकेचे माजी मॅनेजर सचीन बोंबले यांनी निर्मल उज्वल बँकेत चांगले सेव्हिंग व्याज असून एफडीवर सुद्धा चांगले व्याज मिळते असे सांगून कामठी च्या निर्मल उज्वल बँकेत खाते उघडण्यास सांगितल्यावरून सन 2018 मध्ये फिर्यादी चे बचत खाते उघडले व वडिलांना मिळालेली सेवनिवृत्तीची रक्कम एफ डी करायची असल्याने त्यांचे सुदधा बचत खाते उघडले.त्यावेळेस माजी मॅनेजर ने फिर्यादी व त्यांच्या वडिलांना दोन्ही बचत खात्याचे चेक बुक सुदधा दिले.व वडिलांच्या नावाचे 5 लक्ष रुपयाची जमा ठेव एफ डी करून दिले होते मात्र त्याचे एफ डी चे मूळ प्रमाणपत्र मॅनेजर ने दिले नव्हते तसेच दिलेल्या चेक बुक मधून 2 चेक मिसिंग दिसून आले यावर विचारणा केली असता सदर दोन्ही चेक एफ डी च्या कामासाठी ठेवल्याचे सांगितले.तर ऑगस्ट 2018 मध्ये निर्मल उज्वल बँकेत घोटाळा झाल्याचे लक्षात येताच बँकेत भेट दिली जुने कर्मचारी बदलून नवीन कर्मचारी होते तर उपरोक्त नमूद आरोपी सुदधा बँकेत नव्हते दरम्यान पासबुक अपडेट केले असता फिर्यादी च्या खात्यातून आरोपी सचिन बोंबले ने फिर्यादी चे चेक क्र 127152 ने फिर्यादी चे एफ डी मधील साडे तीन लक्ष रुपये काढुन घेतले तसेच फिर्यादी च्या वडिलांचे 5 लाख रुपयांच्या एफ डी वर साडे चार लाख रुपयांच्या लोन ची उचल केल्याचे दिसून आले तसेच खात्यात बेकायदेशीर नोंदी दिसून आल्या.यावर आरोपीशी मोबाईल वर संपर्क साधला असता आरोपी सचिन बोंबले ने सांगितले की बँकेचे संस्थापक प्रमोद मानमोडे यांना निवडणुकी करिता पैश्याची गरज असल्याने त्यांच्या सांगण्यावरून फिर्यादी तसेच इतर खातेदारकांच्या खात्यातून अंदाजे साडे तीन कोटी रुपये प्रमोद मानमोडे यांना दिल्याचे सांगितले तसेच तुमचे पैसे लवकरच परत करू असा विश्वास दिला.यानुसार फिर्यादी व त्याचे वडील यांची 9 लक्ष रुपयाने आर्थिक फसवणूक केल्याची कबुली देत सहा लाख रुपये परत केले मात्र तीन लाख रुपये परत मिळू शकले नाही यावर वेळोवेळी मागणी केली असता उलटपायी परत येत बँकेतुन हाकलून देतात परिणामी न्यायिक भावनेतून सदर पीडितेने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून तीन आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धुगे करीत आहेत.