नागपूर :- जी-20 परिषदेअंतर्गत येथे आयोजित कामगार-20 अर्थात एल-20 बैठकीमध्ये कामगारांची सामाजिक सुरक्षा, आरोग्य आदी विषयांवर आज मंथन झाले.
हॉटेल तुली इंटरनॅशनल येथे भारतीय मजदूर संघाच्यावतीने (विदर्भ प्रदेश) एल-20 बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीचे उद्घाटन भारतीय मजदूर संघाचे महासचिव रविंद्र हिमते आणि केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या सहसचिव दिपीका काचल यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा.संतोष मेहरोत्रा, एल-20 चे मुख्य समन्वयक बि. सुरेंद्रन मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविक बि.सुरेंद्रन यांनी केले. भारताला मिळालेले जी-20 परिषदेचे यजमानपद आणि या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या एंगेजमेंट ग्रुपमध्ये एल-20 चा समावेश आहे. एल-20 अंतर्गत देशातील एकूण 11 मोठ्या शहरांमध्ये मंथन बैठका घेण्यात येत आहेत. त्यातील एक बैठक आज नागपुरात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पेन येथून प्रा. पलाव्हिओ कमीन या बैठकीत दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. येत्या काळात जागतिक स्तरावर कामगारांसमोर उभ्या राहणाऱ्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी एकात्मीक धोरणाची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
प्रा. मेहरोत्रा यांनी भारतातील असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेची गरज नमुद केली, या संदर्भात सादरीकरणही केले. दिपीका काचल यांनी केंद्र शासनाच्यावतीने देशात संघटित व असंघटित कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी समाजाच्या विविध स्तरातून सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या शुभेच्छा संदेशाचे यावेळी नागपूर अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाचे सहायक आयुक्त राजदीप धुर्वे यांनी वाचन केले. डॉ. खाडे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, कामगार क्षेत्राच्या दृष्टिने एल-20 गटाचे भविष्यासाठीचे योगदान महत्वाचे राहणार आहे. एल-20 गटात होणारे विचार-विनिमय आणि निर्णय जगातील कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी महत्वाचे ठरेल. एल-20 गटाने प्राधान्य दिलेल्या विषयांची केंद्र सरकारने अंमलबजावणी सुरु केली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली कामगारांची सामाजिक सुरक्षा व महिला विकास या विषयांवर एल-20 मध्ये सहमती होण्याचा विश्वास व्यक्त करत यासाठी महाराष्ट्र राज्य पुढाकार घेईल, अशी ग्वाही त्यांनी आपल्या संदेशात दिली.
उद्घाटनानंतर एकूण तीन सत्रात एल-20 बैठकीत कामगार विषयक मंथन झाले. या बैठकीस देशभरातील प्रमुख कामगार नेते व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.