मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात आहेत – जयंत पाटील

सरकारने शिधा वाटपाची घोषणा केली मात्र पैशाची तजवीज केली नाही यातून अकार्यक्षमता दिसून येते…

पुणे मनपात मागील पाच वर्षात ‘अर्थाचा अनर्थ’ झाला; पुण्यातील पावसाच्या संकटाची शास्त्रीय चौकशी व्हावी…

मुंबई :- मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होते मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

पुण्यात प्रलय आल्याने शहराची वाताहात झाली त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला तर दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे मात्र मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

मराठवाड्यातील सहा जिल्हयात पावसाने अतिशय गंभीर परिस्थिती केली आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने बळीराजाच्या पाठीशी तातडीने उभे राहून त्यांची दिवाळी समाधानाने जाईल याची व्यवस्था करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

सरकारने शिधा वाटपाची घोषणा उत्साहात केली. सरकार आपली प्रतिमा सुधारण्याच्या गडबडीत आहे त्यातून घोषणा केली मात्र पैशांची जुळणी झालेली नाही असा आरोप करतानाच जुळणी झाली तर किमान दिवाळीच्या अगोदर घोषणा केल्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली. मात्र सरकारने दिवाळी गोड करणार अशी घोषणा करुन पैशांची तजवीज केली नाही यातून सरकारची अकार्यक्षमता लक्षात येते असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

उध्दव ठाकरे यांना नामोहरम करणे आणि त्यांना अडचणीत आणणे असा उद्योग काही लोक करत आहेत मात्र त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उध्दव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत असेही जयंत पाटील म्हणाले.

पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाहीय. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले त्यांनी काहीना काही उद्देश व लाभ ठरवून केले आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत त्यामुळे पुढच्या काळात चित्र वेगळे असेल असेही जयंत पाटील म्हणाले.

पाऊस पडणे हे कुणाच्याच हातात नाही पण पडलेल्या पावसाचे पाणी ताबडतोब घालविण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे होती त्यात पूणे महानगरपालिका कमी पडली असा थेट आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला.

पुणे महानगरपालिकेच्या सुविधा, व्यवस्था, नदीपात्रातून जाणारा पाण्याचा वेग या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा मागच्या पाच वर्षात करता आली असती परंतु ती केली नसल्याने पुण्यातील जनतेवर संकट ओढावले असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

पाऊस पडण्याचे नियंत्रण पालिकेकडे नाही हे सर्वांनाच माहीत आहे परंतु संकट पुणे शहरावर आले गाडया वाहून गेल्या. जर नालेसफाई व इतर गोष्टींकडे लक्ष दिले असते. स्मार्ट सिटी कार्यक्रम राबवला त्यातून कामे केली असती तर चांगलं चित्र दिसले असते पण वेगळा अनुभव आला असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पुणे महानगरपालिकेत मागील पाच वर्षात ‘अर्थाचा अनर्थ’ झाला किंवा काहीच काम झाले नाही. उलट नव्या अतिक्रमणाने, नव्या अडथळयाने पाणी वाहून जाण्याचे प्रमाण स्लो झाले म्हणून हे संकट आले असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

पुणे महानगरपालिकेत आलेल्या संकटाची ‘शास्त्रीय चौकशी’ करणे आवश्यक आहे अशी मागणी करतानाच असा पाऊस आला की, पूर येतो मात्र आपण पहातो व विषय सोडून देतो परंतु पुणे हे देशातील मुंबईनंतर दहाव्या क्रमांकाचे शहर आहे त्यामुळे अशा गुंतवणुकीसाठी योग्य असलेल्या शहरात असे होणे कमीपणाचे आहे. नागरी असुविधा होत असतील तर लक्ष देण्याची आवश्यकता आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय गोंदिया यथे सुरू

Wed Oct 19 , 2022
भंडारा :-  गोंदिया अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय दि. 11 जुलै 2022 पासुन जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा माळा कक्ष क्र. 214, 209 मध्ये सुरू करण्यात आलेले आहे. समिती कार्यालय गोंदिया येथे सुरु झाल्यापासुन नियमितपणे सुनावणी घेण्यात येत आहे. जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आदिवासी बांधवांकडून अर्ज सुद्धा प्राप्त करून घेणे नियमितपणे सुरू आहे. या समितीचे कार्यक्षेत्र भंडारा-गोंदिया जिल्हयाकरीता असून भंडारा-गोंदिया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!