ग्रंथोत्सवामुळे वाचनसंस्कृतीला चालना – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

– जिल्ह्यात सर्वसुविधायुक्त चार अभ्यासिका स्थापन करणार

गडचिरोली :- “आजच्या मोबाईल युगात नवीन पिढी वाचनसंस्कृतीपासून दूर जात आहे. मात्र, वाचनामुळे समाजात प्रतिष्ठा वाढते आणि देशाच्या प्रगतीतही हातभार लागतो. ग्रंथोत्सव उपक्रमामुळे वाचन संस्कृतीला नव्याने चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होईल,” असे मत सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद हायस्कूल सभागृह, चामोर्शी रोड येथे आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे होते, तर आमदार रामदास मसराम व आमदार डॉ. मिलींद नरोटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री जयस्वाल म्हणाले, “वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात सर्व सुविधायुक्त अभ्यासिका स्थापन केल्या जातील. सुरुवातीला गडचिरोलीसह इतर तीन तालुक्यांमध्ये मिळून एकूण चार ठिकाणी या अभ्यासिका सुरू करण्यात येतील. या अभ्यासिकांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात येतील, जेणेकरून ते अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतील.”

ते पुढे म्हणाले, “ग्रंथोत्सव हा केवळ पुस्तकांच्या विक्री आणि प्रदर्शनापुरता मर्यादित नाही, तर हा एक वैचारिक चळवळ आहे. वाचनामुळे समाजात नवीन विचार रुजतात आणि त्यातून नवी दिशा मिळते. म्हणूनच, अशा उपक्रमांना पाठिंबा देणे गरजेचे आहे.”

यावेळी आमदार रामदास मसराम यांनी विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावून घ्यावी, कारण वाचनामुळे जीवनाला नवी दिशा मिळते, असे सांगितले. तर आमदार डॉ. मिलींद नरोटे यांनी नवीन विचार रुजवण्यासाठी पुस्तक वाचन आवश्यक असल्याचे मत मांडले.

ग्रंथालय अधिकारी गजभारे यांनी प्रास्ताविक करताना गडचिरोली ग्रंथोत्सवाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी ‘आजचा वाचक आणि ग्रंथालये’ तसेच ‘मराठी भाषा – अभिजात भाषा : उगम आणि उत्कर्ष’ या विषयांवर परिसंवाद व कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी इंदिरा गांधी चौकातून ग्रंथ दिंडीही काढण्यात आली.

ग्रंथोत्सव उद्घाटन कार्यक्रमाला ग्रंथालय संघाचे भाऊराव पत्रे व जगदिश मस्के, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, पुस्तकप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वेकोलि कामठी खुली खदान येथुन ६ बँट-या चोरी

Fri Feb 14 , 2025
कन्हान :- वेकोलि कामठी खुली कोळसा खदान येथे ५० टन ब्रिज काटया जवळील रेलटेल यु.पी.एस च्या ६ बँट-या अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी यांचे तक्रारीवरून कन्हान पो स्टे ला अज्ञात चोरा विरूध्द कन्हान पोलीसानी गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे. वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत कामठी खुली कोळसा खदान येथील ५० टन ब्रिज काटयाजवळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!