संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली नदीच्या कडेला असलेल्या दगडावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना परवा 1 नोव्हेंबर ला सकाळी साडे दहा वाजता निदर्शनास आली असता रेल्वे गाडीच्या धडकेने घडलेली अपघाती मृत्यूची घटना असावी असा तर्क लावण्यात येत होता. मात्र त्याच्या पॅन्ट च्या खिशातून मिळालेल्या आधारकार्डच्या आधारे सदर अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून मृतक तरुणाचे नाव सुशांत कीर्तन नाईक वय 29 वर्षे रा ओडीसा असे आहे मात्र मृत्यूचे कारण अजूनही गुलदस्त्यात असले तरी कदाचित रेल्वे प्रवास करीत असताना रेल्वे गाडीतून तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला असावा असा तर्क लावण्यात येत आहे. पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेहाच्या पार्थिवावर कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेद करण्यात आले असून अंत्यसंस्कारची प्रतीक्षा आहे.