चिमूर :- भाजपाच्या संकल्पपत्राद्वारे महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी आम्ही अनेक योजना आखल्या आहेत. येत्या पाच वर्षाकरिता हे संकल्पपत्र म्हणजे विकासाची गॅरंटी आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चिमूर येथील जाहीर प्रचारसभेत बोलताना दिली. गेल्या अडीच वर्षांत डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाचा दुप्पट वेग महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवला आहे, प्रत्येक विकास योजनेत खोडा घालणाऱ्या महाविकास आघाडीचा कारभारही जनतेने अनुभवला आहे, असे सांगून मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस, भाजपा- महायुतीचे उमेदवार किर्तीकुमार भांगडिया, माजी खासदार अशोक नेते, शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. डॉ. मनीषा कायंदे आदी उपस्थित होते.
आज महाराष्ट्रात एक डझन वंदे भारत ट्रेन धावत आहेत. शंभराहून अधिक रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात आहे, बंदरांचा विकास होत आहे, महामार्ग निर्माण होत आहेत, नवे रेल्वेमार्ग बांधले जात आहेत. महायुतीचे सरकार वेगवान काम करते, मात्र महाविकास आघाडीवाले त्यामध्ये अडथळे आणतात. महाराष्ट्राचा एवढा वेगवान विकास ही आघाडीवाल्यांच्या आवाक्यातील बाब नाही, त्यांनी केवळ विकासकामे लटकावणे, अडकविणे आणि भरकटवणे यांत नैपुण्य मिळविले आहे. अडीच वर्षांत मेट्रो, वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग आणि प्रत्येक विकास योजनेत खोडा घातला. आघाडी म्हणजे ‘भ्रष्टाचार का सबसे बडा खिलाडी’ आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीवर कडाडून टीका केली. त्यांना पुन्हा महाराष्ट्र लुटण्याचा परवाना देऊ नका, असे आवाहनही मोदी यांनी केले.
काँग्रेस व त्यांचे साथीदार हिंसा आणि विभाजनवादाच्या तव्यावर राजकारणाची पोळी भाजून घेत आहेत. अलीकडेच जम्मू काश्मीर विधानसभेत जे झाले ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. जम्मू काश्मीर कित्येक दशकांपासून विभाजनवाद आणि दहशतीच्या आगीत जळत राहिला. महाराष्ट्राचे अनेक जवान मातृभूमीचे रक्षण करताना त्या भूमीत शहीद झाले. हे पाप कोणाचे, असा सवालही मोदी यांनी केला. ज्या 370 व्या कलमाआडून हे सारे झाले ते कलम 370 ही काँग्रेसची देणगी होती. आम्ही हे कलम रद्द केले, काश्मीरचे भारत व भारताच्या संविधानाशी नाते जोडले. बाबासाहेबांचे संविधान संपूर्ण देशाने स्वीकारले, लागू केले, पण संविधानाची जपमाळ ओढणाऱ्या या लोकांनी सात दशकांहून अधिक काळ जम्मू काश्मीरमध्ये मात्र संविधान लागू केले नव्हते. मोदी सत्तेवर येण्याआधी देशात दोन संविधान अमलात होते.
बाबासाहेबांचे संविधान संपूर्ण देशात तर, जम्मू काश्मीरमध्ये दुसरे संविधान लागू होते. 370 व्या कलमाच्या भिंतीने बाबासाहेबांच्या संविधानास जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश रोखला होता. जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही हे कलम कायमचे गाडून टाकले आहे. पण काँग्रेसवाले आणि त्यांचे सहकारी हे सहन करू शकत नाहीत, म्हणून पाकिस्तानला हवे असलेले 370 कलम पुन्हा लागू करण्याचा ठराव विधानसभेत आणून संमत करण्यासाठी ते धडपडत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलेले बाबासाहेबांचे संविधान पुन्हा एकदा हटविण्याचे काम करण्याचा त्यांचा इरादा जनता कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
चंद्रपूरच्या भागात नक्षलवाद्यांच्या हैदोसामुळे हिंसाचार वाढला, औद्योगिक विकास रोखला गेला, काँग्रेस व त्यांच्या साथीदारांनी जनतेला खुनी खेळात ढकलले. आम्ही नक्षलवादाचा बीमोड केल्याने आता हे क्षेत्र सुटकेचा श्वास घेत आहे. चिमूर आणि गडचिरोलीच्या परिसरात विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, आणि पुन्हा नक्षलवाद उचल घेणार नाही यासाठी काँग्रेस व त्यांच्या साथीदारांना इकडे फिरकू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेस आणि त्यांचे साथीदार ओबीसी, आदिवासी, दलितांमध्ये फूट पाडून संघटित समाजात संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न करत असून या धोकादायक खेळापासून सावध रहा,’ एकत्र असू तरच सुरक्षित राहू’ असेही ते म्हणाले. ‘सबका साथ सबका विकास’ हा भाजपा -महायुती सरकारचा मंत्र आहे, गरीबांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो, कोट्यवधी गरीबांना घरे मिळाली, मोफत उपचारांची हमी मिळाली, नव्या सरकारच्या पहिल्या काही दिवसांतच आयुष्मान योजनेचा लाभ 70 वर्षांवरील प्रत्येकास दिला, गावागावात रस्ते, वीज पोहोचविली, कोट्यवधी कुटुंबांना पाणी जोडण्या मिळाल्या, एकट्या चिमूर जिल्ह्यात 16 लाख कुटुंबांना मोफत धान्य मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. गरीब कल्याण योजनांचा सर्वाधिक फायदा वंचित, दलित, पीडीत, ओबीसी आदिवासींना मिळाला आहे. असे सांगून विदर्भातील विकास कामांची संपूर्ण यादीच मोदी यांनी सादर केली. या विकासकामांमुळेच गेल्या दहा वर्षांत 25 कोटी लोकसंख्या गरीबीतून बाहेर आली, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात महायुती सरकार याच योजना पुढे राबवून महाराष्ट्राला, शेतकऱ्यांना समृद्ध बनवेल, अशी ग्वाहीही मोदी यांनी दिली.