– भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत अनेक तृतियपंथियांचा भाजपामध्ये प्रवेश
मुंबई :- वंचित, उपेक्षित वर्गांची सर्वांगीण उन्नती तसेच त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणण्याचे लक्ष्य ठेवून भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून समाजातील उपेक्षित अशा तृतियपंथी समाजाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच भाजपातर्फे तृतियपंथीयांची आघाडी गठित करण्यात येईल अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने तृतिय़पंथियांनी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. या पक्षप्रवेशाला प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ता ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. बावनकुळे यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत केले.
यावेळी बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्प पूर्ण करण्यासाठी तृतियपंथी समाजातील अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचे हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी भाजपा कटीबद्ध असून केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील तृतियपंथियांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. या समाजातील प्रमुख पदाधिकारी झालेल्या जवळपास 50 जणांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून अधिकार प्राप्त होतील. जिल्ह्यातील प्रमुखांना त्या त्या जिल्ह्यात प्रतिनिधी म्हणून पक्षात यथोचित स्थान देण्यात येईल. तसेच या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन होणाऱ्या आघाडीमध्ये एक प्रमुख, एक संयोजक आणि 5 ते 6 जणांची सह-संयोजक म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले.
तृतियपंथी समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपाचे सक्रीय सदस्य व्हावे तसेच राज्यभरात 5 लाखांच्या आसपास असणाऱ्या सर्व तृतियपंथियांनी भाजपाचे सदस्य व्हावे असे आवाहनही बावनकुळे यांनी केले.
यावेळी डॉ.सान्वी जेठवाणी म्हणाल्या की, या दुर्लक्षित समाजाचे प्रश्न भाजपा सोडवू शकतो, असा विश्वास वाटल्याने तृतियपंथांनी भाजपाला साथ दिली आहे.
यावेळी राज्यभरातील अनेक तृतियपंथियांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यामध्ये कोल्हापूर येथील मयुरी आळवेकर, नागपूर येथील राणी ढवळे, बेबी नायक, धुळे येथील पार्वती जोगी, प्रेरणा वाघेला, कादंबरी (पुणे), मुंबईतील शोभा नायक, अकोला येथील सिमरन नायक, छ.संभाजीनगर येथील कोमल, अल्ताफ शेख, नाशिक येथील सलमा गुरू, आशा पुजारी (ठाणे) आदींचा समावेश होता.