विधानसभेसाठी भाजपा बूथ स्तरापर्यंतची संघटना सक्षम करणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जवळपास 97 हजार बूथ, शक्तीकेंद्र तसेच मंडल स्तरावर संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व शक्तिनिशी महायुती एकत्रितरित्या उतरणार असून महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला

भाजपा प्रदेश कार्यालयात दोन दिवस झालेल्या 30 पदाधिका-यांच्या बैठकी बाबतची माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली. बावनकुळे म्हणाले की विधानसभा निवडणुकीसोबतच भाजपा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्राम पंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागणार आहे. या बाबतची विस्तृत योजना गुरुवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत आखली गेली आहे. विधानसभा निवडणुकीबरोबरच पंचायत समिती, नगर पालिका आणि महापालिका स्तरावरील नेत्यांना यथायोग्य जबाबदारी दिली जाणार आहे. महायुतीच्या सर्वसमावेशक अर्थसंकल्पातील विशेष तरतुदी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची योजना कोअर कमिटीच्या बैठकीत ठरवण्यात आली तसेच डबल इंजिन सरकारचा अधिकाधिक लाभ राज्यातील जनतेला कसा करून देता येईल याचीही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

21 जुलै रोजी पुणे येथे पक्षाचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन होणार आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे या अधिवेशनाचा समारोप करणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.

बैठकीबाबत कल्पित बातम्या देऊ नका

गुरुवारी झालेल्या बैठकीत मित्रपक्षांबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा, टिप्पणी भाजपाच्या नेत्यांनी केली नसताना माध्यमांमधून चुकीच्या बातम्या देत महायुतीमध्ये जाणीवपूर्वक ठिणगी पाडण्याचे काम करण्यात आले, अशी खरमरीत टीकाही श्री. बावनकुळे यांनी केली. बैठकीत झालेल्या चर्चेबाबत पक्षाकडून माहिती दिली जाते. जे घडलेच नाही ते घडल्याची बातमी देणे माध्यमांनी थांबवावे अशी विनंतीही बावनकुळे यांनी केली. अशा चुकीच्या बातम्यांसंदर्भात पक्ष संघटनेत नाराजी असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. राज्यातील माध्यमांना एक विशीष्ट उंची आणि संस्कार आहेत ते अबाधित ठेवून वृत्तांकन व्हायला हवे असेही त्यांनी नमूद केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्र शासनाकडुन चंद्रपूर मनपा स्पार्क पुरस्काराने सन्मानित

Fri Jul 19 , 2024
– तृतीय क्रमांकाचे दोन पुरस्कार प्राप्त चंद्रपूर :- केंद्रीय गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाच्या दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत २०२३-२४ वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या देशातील ३३ महापालिका व नगरपालिकांचा ‘स्पार्क अवॉर्ड-२०२४’ (सिस्टमैटीकल रिअल टाइम रैंकिंग) देवून गौरव करण्यात आला. यात चंद्रपूर महानगरपालिकेने उत्कृष्ट स्थानीक स्वराज्य संस्था म्हणुन तृतीय क्रमांक व नावीन्य शहर स्तर संघ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल देशात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com