‘बाबांचा पैसा बाबांच्या कामासाठी उपयोगी आणण्याची नितीन गडकरी यांची सूचना
नागपूर दि. १३ :- नागपूर येथील ताजुद्दीन बाबा यांच्या कृपादृष्टीचा प्रसाद सर्व धर्मीयांना कायम मिळत आला आहे. त्यामुळे हे धार्मिक स्थळ सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणाच्या विकास कामाचा दुसरा टप्पा देखील लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री आयोजित कार्यक्रमात केली.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत आयोजित मोठा ताजबागेतील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये ते बोलत होते.व्यासपीठावर केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी व अन्य ट्रस्टी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यावेळचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ताजबाग विकासासाठी 132 कोटीचा आराखडा तयार केला होता.या आराखड्यातील विकास कामाच्या लोकार्पणाचा शानदार सोहळा ताजुद्दीन बाबा यांच्या दरबारात आज आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी देश विदेशातून बाबांचे भक्त येतात. त्यामुळे त्यांना उत्तम दर्जाच्या सुविधा बहाल करणे आवश्यक होते. त्यासाठी प्यारे खान यांच्या नेतृत्वातील ट्रस्टींवर विश्वास ठेवून पहिल्या टप्यामधील काम करण्यात आले.अतिशय गुणवत्तापूर्वक ही कामे झाली असून ‘जो बाबा का है वो बाबा के पास ही रहना चाहिए ‘, या मूलतत्त्वावर हा विकास झाला आहे. त्यामुळे हे बदललेले स्वरूप आज आपल्यापुढे आहे. मात्र आम्ही इथेच थांबणार नसून बाबांचे देश विदेशातील भक्त येत असताना त्यांना आणखी चांगल्या सुविधा मिळाव्यात. यासाठी दुसऱ्या टप्प्यातील आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून महाराष्ट्र शासन या विकास कामांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बाबा ताजुद्दीन यांची श्रद्धा आपल्या परिवारातही अमीट असल्याचे सांगितले. बाबांच्या दरबाराचा इतिहास हा प्राचीन असून प्राचीन काळापासून सर्व धर्मीयांचे हे श्रद्धास्थान असल्याचे सांगितले. मानव जातीची श्रद्धा या ठिकाणी असून या ठिकाणच्या विकासाला आधुनिक रूप देण्याचे त्यांनी सांगितले. शेगावच्या गजानन महाराज संस्थान प्रमाणे या ठिकाणचा विकास व्हावा या ठिकाणी काम करणाऱ्या ट्रस्टींनी ‘जो बाबा का है, वह बाबा के पास जायेगा ‘, या विश्वासाने काम करावे, या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसोबतच या परिसरात ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी सूचना केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी यांनी केले. यावेळी आमदार मोहन मते यांनी या ठिकाणांच्या विकास कामाची भूमिका मांडली. तर ताजुद्दीन बाबा ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांनी शासनाने केलेल्या मदतीची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.