– नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रेल्वे स्थानकाकडे निघालेला व्यक्तीला जमावाने बेदम मारले, सहा दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्याचं निधन झाले.
नागपूर :- हिंसाचारात एका व्यक्तीचा बळी गेल्याचं समोर आलेय. सोमवारी नागपूरमध्ये दोन गटामध्ये जोरदार राडा झाला, त्यावेळी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या एका व्यक्तीला जमावाने बेदम मारहाण केली होती. सहा दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते, आज त्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री ८ वाजता नागपूरमधील महाल भागात हिंसाचार उफळला होता. त्यामध्ये दगडफेक अन् जाळपोळ झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी अनेकांना अटक केली असून चौकशी सुरू आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणात मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. सोमवारी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या इरफान अन्सारी यांचा मृत्यू झाला आहे. इरफान अंसारी हे सोमवार नागपूरच्या हंसापुरी परिसरातून गितांजली टॉकीज चौकातून रेल्वे स्टेशनवर रेल्वे पकडण्यासाठी जात होते. त्यावेळी अचानक हिंसाचार सुरु झाला. संतप्त जमावाने इरफान अन्सारी यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये अन्सारी गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर अन्सारी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होते. सहा दिवसांनंत इरफान अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आणखी दोन जणांना बेड्या –
हिंसाचार प्रकरणात मास्टरमाईंड एमडीपी पार्टीचा शहराध्यक्ष फाईम खान याच्यासह पोलिसांनी याच पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्युबवर मोहम्मद शेहजाद खान यांना अटक केली आहे. महाल आणि हंसापुरी या भागात सोमवारी रात्री घडलेला हिंसाचाराच नियोजन सकाळीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. सोमवारी झालेल्या दंगलीत अनेकजण जखमी झाले होते. त्यामध्ये अन्सारी यांचाही समावेश होता. अन्सारी यांचा आज मृत्यू झाला आहे.
१०४ जणांना अटक –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये पोलीस आयुक्तांची भेट घेतली. नागपूर हिंसाचाराबद्दल माहिती घेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी जवळपास चार पाच तासात दंगलीला आवर घातला, प्रतिबंधात्मक कारवाई केली. आतापर्यंत 104 लोकांना अटक केली आहे. यात अजून ओळख पटवणे सुरू आहे, यापेक्षा जास्त लोकांची अटक होणार आहे. जो जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय, त्यावर कारवाइ होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.