– इन्फोसीस नागपूर डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन
नागपूर :- माहिती तंत्रज्ञान (आयटी) हे भारताचे भवितव्य आहे. या क्षेत्रात इन्फोसीसने जागतिक स्तरावर मानाचे स्थान निर्माण केले आहे. रोजगार वाढीमध्येही इन्फोसीसने मोठे योगदान दिले आहे. आता विदर्भातील युवकांनाही त्याचा लाभ होत आहे आणि भविष्यातही मोठ्या प्रमाणात होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
मिहान येथे इन्फोसीस नागपूर डेव्हलपमेंट सेंटरच्या इमारतीचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, इन्फोसीसचे सीएफओ निलांजन रॉय, नागपूर इन्फोसीसचे प्रमुख तरंग पुराणिक, इन्फोसीसचे माजी उपाध्यक्ष सुनील धरेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी यांनी मिहानमध्ये एक अतिशय उत्तम व इको-फ्रेंडली इमारत निर्माण केल्याबद्दल इन्फोसीसचे अभिनंदन केले.
ना. गडकरी म्हणाले, ‘मिहान हा आमचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि आज एवढ्या सुरेख पद्धतीने हा भाग विकसित झालेला बघून विशेष आनंद होतो. आज देशात जास्तीत जास्त नोकऱ्यांची आवश्यकता आहे. देशाच्या आर्थिक विकासासाठी ते अत्यंत गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचे आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्माणाचे स्वप्न बघितले आहे. त्यात इन्फोसीससारख्या सर्व कंपन्यांचे मोठे योगदान असणार आहे.’
मिहानमध्ये जवळपास सर्वच आयटी कंपन्या आहेत आणि त्यामुळे मिहानही उत्तम स्थितीत आहे. याठिकाणी सर्व पायाभूत सुविधा विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे मी सातत्याने सर्वच मोठ्या कंपन्यांना नागपुरात येण्याचे आवाहन करीत असतो. नागपूरला झिरो माईल असल्याने देशातील सर्व मेट्रो शहरे विमानाने नागपूरशी जोडलेली आहेत. अनके मोठ्या कंपन्या इथे गुंतवणुक करायला तयार आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले.
‘२५ हजार रोजगाराची क्षमता’
मिहानमध्ये खूप क्षमता आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये इथे १ लाख तरुणांना रोजगार मिळाला. पण आता पुढील तीन वर्षांत आणखी १ लाख तरुणांना रोजगार मिळेल, असा मला विश्वास आहे. पण इन्फोसीस ज्या पद्धतिने जागतिक स्तरावर प्रगती करीत आहे, ते २५ हजार तरुणांना रोजगार देण्याची क्षमताही ठेवतात, असेही ना. गडकरी म्हणाले.
नागपूर हे आयटी हब : देवेंद्र फडणवीस
नागपूर आता आयटी हब म्हणून नावारुपाला येत आहे. सर्व मोठ्या कंपन्या इथे येत आहेत. या सर्व कंपन्यांची वाढ होणारच आहे. पण इन्फोसीसने एक उत्तम सुविधा इथे उपलब्ध करून दिली याचा विशेष आनंद आहे. मिहानमध्ये इन्फोसीसने २५० कर्मचाऱ्यांपासून काम सुरू केले आणि आता २ हजार ५०० कर्मचाऱ्यांसह ही कंपनी इथे काम करीत आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस म्हणाले.