नागपूर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या रामटेक व मौदा उपविभागाच्या व्यस्त कार्यक्रमात जलयुक्त शिवार कार्यक्रमाला प्राधान्य देत नाला खोलीकरणाचे भूमिपूजन केले.तर अन्य एका कार्यक्रमात पाणंद (पांदण) रस्त्याचे लोकार्पण केले. उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी रामटेक व मौदा उपविभागाच्या दौऱ्यावर होते.
रामटेक येथील बैठकीनंतर मौदाकडे जाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. याच मार्गावर चाचेर गावापुढे मातोश्री पाणंदरस्ते योजनेअंतर्गत नवेगाव आष्टी शिवारातील पाणंद रस्त्यांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर काहीच अंतरावर नवेगाव आष्टी ग्रामपंचायत खंडाळा येथील नालाखोलीकरण कामाचे भूमीपूजन करण्यात आले. एनटीपीसी यांचा सामाजिक दायित्व निधी व आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेच्या सहभागात हे काम सुरू आहे. या ठिकाणी जेसीबीद्वारे खोलीकरणाचे काम सुरू होते.उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी या कामाच्या कालमर्यादेबाबत विचारपूस केली.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशिष जायस्वाल, खासदार कृपाल तुमाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, उपविभागीय अधिकारी संजय पवार, कामठी तहसीलदार अक्षय पोयाम, मौदा तहसीलदार मालिक विराणी आदींसह मान्यवर उपस्थित होते.