नागपूर :- स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित डायग्नोस्टिक्स सेंटरचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. २४ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लष्करी बाग (कमाल चौक) येथील विजयी भारत समाज ग्राऊंडवर सकाळी ९.३० वाजता हे भूमिपूजन होणार आहे. यावेळी विजयी भारत समाजचे सचिव प्रभाकर येवले अध्यक्षस्थानी राहतील, तर भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सेंटरच्या वतीने गरीब, गरजू व निराधार नागरिकांना नेत्र तपासणी, रक्त तपासणी, क्ष-किरण तपासणी, एमआरआय, सीटी स्कॅन इत्यादी अत्याधुनिक रोग निदान सेवा नाममात्र शुल्कात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याप्रसंगी नेत्र व कर्ण तपासणीसाठी अतिरिक्त रुग्णवाहिका तसेच दंत तपासणी व उपचारासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेचे लोकार्पणही ना. गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन सुरेश कुमरे, प्रभाकर तारेकर, जगदीशप्रसाद आशिया, पी. सी. एच. पात्रुडू, गणेश कानतोडे यांनी केले आहे.
नेत्र व कर्ण तपासणीसाठी आणखी एक रुग्णवाहिका
स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने सध्या निःशुल्क नेत्र व कर्ण तपासणीसाठी एक रुग्णवाहिका समर्पित करण्यात आली आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांची नेत्र व कर्ण तपासणी या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून झाली असून अनेकांवर निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली, तर बऱ्याच नागरिकांना अत्यल्प दरात कर्णयंत्र वितरित करण्यात आले आहे. मात्र, वाढती गरज लक्षात घेता आणखी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी होईल.
दंत तपासणीसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका
नेत्र व कर्ण तपासणीप्रमाणे दंत तपासणीसाठी देखील स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. २४ सप्टेंबरपासून दंत तपासणी व उपचारासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. ना. गडकरी यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण होईल. दात स्वच्छ करणे, दात काढणे, कवळी बसविणे यासह मुखकर्करोगाचे निदान व उपचार आदी सुविधा या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पुरविल्या जाणार आहेत.