मुंबई :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.१४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. या जयंती सोहळ्याचे राज्यशासन, पोलिस आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाने योग्य समन्वयाने भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजीच्या १३४ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, मुंबई महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्विरित्या पार पाडावी. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेबाबत दक्षता घेण्यात यावी.
चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी आणि नागरिकांसाठी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात यावी. त्यामध्ये उन्हापासून संरक्षणासाठी मंडप उभारावेत. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था असावी. तसेच दादर आणि संबंधित परिसरात वाहतूक पोलिसांनी रहदारीचे योग्य नियंत्रण ठेवावे व जागोजागी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर स्टेशन ते चैत्यभूमीदरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्याव्यात.
या बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, “लोकराज्य” चा विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिध्दी याबाबत चर्चा झाली व याबाबत निर्देश देण्यात आले. बैठकीत मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.