बारावीच्या निकालात मनपाच्या विद्यार्थिनींची भरारी

– मनपाच्या कनिष्ठ महाविद्यालयांचा ८१.८६ टक्के निकाल

नागपूर :- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, बारावीच्या निकालात नागपूर महानगरपालिकेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

बारावीच्या निकालात मनपाच्या विद्यार्थिनींनी उत्तुंग भरारी घेतली असून, तिन्ही विद्याशाखेत विद्यार्थिनीनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांमधून मनपाने ८१.८६ टक्के निकालाची कामगिरी नोंदविली आहे. बारावीत घवघवीत यश संपादित करीत मनपाच्या महाविद्यालयाचे, शिक्षकांचे व पालकांचे नावलौकीक करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.21) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या गुणवंत विद्यार्थांना अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभा कक्षात आयोजित छोटेखानी समारंभात मनपाचे उपायुक्त प्रकाश वराडे, शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे, सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे, संजय दिघोरे, राजेंद्र सुके, शाळा निरीक्षक सर्वश्री. विजय वालदे, जयवंत पित्तुले, प्रशांत टेंभूणे, वितीना इवनाते, अश्विनी फेदेद्वार, कीर्ती गणवीर यांच्यासह चारही कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन करणकर, हर्षा भोसले, माधुरी काटकर, नसीन बानो प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी विद्यार्थांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “इयत्ता नववी ते इयत्ता बारावी” या चार वर्षात विद्यार्थांचे भविष्य घडत असते. चार वर्ष अथक परिश्रम घेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना पुढील वाटचालीत हमखास यश मिळते. त्यामुळे विद्यार्थांनी निरंतर परिश्रम व मेहनत सुरु ठवावी, असे मोलाचे मार्गदर्शन गोयल यांनी केले. तसेच मनपाच्या शिक्षण विभागाने मिशन नवचेतना अंतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा असे निर्देश दिले.

बारावीच्या परीक्षेत मनपाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिन्ही शाखेमध्ये उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले असून, विज्ञान शाखेमधून व मागासवर्गीय गटातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी मैथिली तामगाडगे, ७१.१७ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकाविला. तर वाणिज्य शाखेतून एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अनम परवीन मो. नफीस शेख हिने ८२.३३ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकाविला. याशिवाय कला शाखेतून साने गुरुजी उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कासेबा नाझ सिराज हिने ६९.०० टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकाविला. बारावीच्या परीक्षेत मनपाच्या चारही कनिष्ठ महाविद्यालयांचा एकूण निकाल ८१.८६ टक्के एवढा लागला असून, यामध्ये मनपा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा ७९.५९ टक्के, साने गुरूजी उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचा ८३.३३ टक्के, ताजाबाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचा ९२. ८६ टक्के तर एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचा ७९.२९ टक्के निकाल लागला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष उपासे यांनी तर आभार राजेंद्र सुके यांनी व्यक्त केले.

मैथिली तामगाडगे ला व्हायचं डॉक्टर

विज्ञान शाखेमधून व मागासवर्गीय गटातून ७१.१७ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या मैथिली तामगाडगे हिला डॉक्टर व्हायचे आहे. सर्वसामान्य घरातून येणाऱ्या मैथिलीने आपल्या यशाचे श्रेय वडिलांना दिले आहे. अभ्यास करतांना शिक्षणांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.

सीए होण्याची आहे अनम परवीनची इच्छा

वाणिज्य शाखेतून ८२.३३ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या अनम परवीन मो. नफीस शेख हिला वाणिज्य शाखेत आपले करियर घडवायचे आहे. पुढे चालून चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून अनमला सीए ची परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे.

निकाल खालीलप्रमाणे

विज्ञान शाखा निकाल:

मैथीली विक्रम तामगाडगे – 77.17 टक्के गुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, मनपा, नागपूर

करण देवेंद्र उपाध्याय- 70.83 टक्के गुण- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, मनपा, नागपूर

नैना रविंद्रकुमार शाहु- 70.33 टक्के गुण -डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, मनपा, नागपूर

वाणिज्य शाखा निकाल:

अनम परवीन मो. नफीस शेख- 82.33 टक्के गुण – एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालय

तकशरा परवीन अजीमुद्यीन अंसारी- 68.33 टक्के गुण- एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालय

सैय्यद बहुद्यीन इम्तीयाज 65.67 टक्के गुण-ताजाबाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालय, मनपा, नागपूर

कला शाखा निकाल :

कसेबा नाझ सिराज 69 टक्के गुण- साने गुरुजी उर्दु कनिष्ठ महाविद्यालय, मनपा, नागपूर

रोजीना परविन शमीन 68.17 टक्के गुण- साने गुरुजी उर्दु कनिष्ठ महाविद्यालय, मनपा, नागपूर

समरीन फिरदोस अब्दुल हकीम 65 टक्के गुण -साने गुरुजी उर्दु कनिष्ठ महाविद्यालय, मनपा, नागपूर मागासवर्गीय गटातून प्रथम – मैथीली विक्रम तामगाडगे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तंबाखू सेवनामुळे दातांचे आरोग्य बिघडले ! अनेक आजारात वाढ

Wed May 22 , 2024
यवतमाळ :- तंबाखूच्या सेवनामुळे दातांचे आरोग्य बिघडत असून, पांढरा चट्टा, लाल चट्टा, तोंड कमी उघडणे, हिरड्यावर सुज येणे, दातांमध्ये इन्फेक्शन वाढणे आदी समस्यांमुळे अनेकजण त्रस्त आहेत. राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ कालावधीत १४ हजार ७१२ जणांची तपासणी केली असता, यात अनेकांच्या दातांना कीड लागल्याचे निदर्शनास आले आहे. काहींना पांढरा चट्टा, लाल चट्टा आणि तोंड न उघडण्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com