बांधकाम कामगारांना ओळखपत्राद्वारे विविध योजनांचा लाभ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– बांधकाम कामगार मेळावा

– उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना ओळखपत्रांचे व बचतगटांना फुड कार्टचे वितरण

नागपूर :- सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याच्यादृष्टीने राज्य शासन कार्य करीत आहे, त्यासाठी विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. बांधकाम कामगारांना ओळखपत्र वितरणाच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे आरोग्य, शिक्षण, घरकुल आदी लाभ देण्यात येत असल्याचे, प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात केले. त्यांच्या हस्ते कामगारांना ओळखपत्र, संसार व सुरक्षा किटचे तसेच बचतगटांना फुड कार्टचे (गाड्या) वाटप करण्यात आले.

येथील जयताळा परिसरातील एसआरपी मैदानावर आयोजित ‘बांधकाम कामगार मेळाव्यात’ उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांच्यासह मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून जयताळा परिसरातील ४ हजार कामगारांची नोंदणी झाल्याची माहिती मिळाली असून ही आनंदाची बाब आहे. नोंदीत कामगारांना ओळखपत्र वितरीत करुन त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य, शिक्षण, घरकुल आदी १२ सेवा देण्यात येणार आहे. कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासन सदैव अग्रेसर असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या मेळाव्यात महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर यांच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत अर्थसहाय्यित प्रातिनिधिक बचत गटांना ‘तेजस्विनी अन्नपूर्णा फूड कार्ट’ हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. एकूण २० फुड कार्टच्या माध्यमातून २०० महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. येत्या काळातही बचत गटांना असे फुड कार्ट वितरीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भागात बेघरांना मालकी हक्काचे पट्टे देण्याच्या दिशेने काम सुरू असून येत्या ६ महिण्यात हे काम पूर्ण होईल व पट्टे वितरीत करण्यात येणार आहे.

राज्यशासनाने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपयांची मदत देण्यात येते. या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा निधी महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर महिन्यातच राज्य शासन देणार असून ही लाडक्या बहिणींसाठी भाऊबीज ठरणार आहे. ‘लेक लाडकी योजने’च्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते १८ वर्षा पर्यंत टप्प्या टप्प्याने १ लाखा पर्यंतची मदत देण्यात येत आहे. मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. राज्यातील १ कोटी महिलांना लखपतीदीदी करण्याचा निर्धार राज्य शासनाने घेतला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमात फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ५ महिला कामगारांना ओळखपत्र, संसार व सुरक्षा किटचे तसेच प्रातिनिधिक स्वरुपात बचतगटांना फुड कार्ट वितरीत करण्यात आल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिक्षण हेच विकासाचे द्वार - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Thu Oct 3 , 2024
– गोंडवाना विद्यापीठाचा 11 वा व 12 वा दीक्षांत सोहळा संपन्न -जनतेच्या विकास प्रक्रीयेत विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका    – सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी. लिट. पदवी प्रदान  गडचिरोली :- शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षांत सोहळा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com