– अकरा कोटींच्या कामाला मंजुरी
-1 कोटीच्या खर्चातून नरखेडला ठाणे
नागपूर :- मध्य रेल्वेने आरपीएफ जवानांसाठी बरॅक बनविण्याचा निर्णय घेतला असून, मुख्यालयाकडून 11 कोटी रुपयांच्या बांधकामाला मंजुरीसुद्धा मिळाली आहे. विभागात काही ठिकाणी बांधकामाला सुरुवात देखील झाली असून, नागपूर विभागात डिसेंबरपर्यंत सर्वच आरपीएफ ठाण्यात बरॅक तयार झालेल्या असतील. आरपीएफ जवानांसाठी ही आनंदाची बाब असून बरॅकमुळे तणावमुक्त ड्युटी करण्यास मदत होईल.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर, अजनी, बल्लारशाह, वर्धा, चंद्रपूर, धामणगाव, नरखेड, आमला, बैतुल आणि जुन्नारदेव या स्थानकांवर आरपीएफ ठाणे आहेत. विभागात जवळपास 470 जवान नेमणुकीवर आहेत. यातील बहुतांश जवान विविध राज्यातील आहेत. काही कुटुंबासह येतात तर काही कुटुंबाला सोडून. एकट्या जवानांसाठी राहण्याची अडचण होते. अशा कर्मचार्यांसाठी आरपीएफ ठाण्याजवळच बरॅकचे बांधकात करण्यात येणार आहे. एका बरॅकमध्ये 15 ते 20 जवानांच्या राहण्याची क्षमता असेल. प्रत्येक बरॅकला जवळपास 1.7 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. बरॅकध्ये राहणे, भोजनासह घरासारख्या सुविधा असतील. त्यामुळे परप्रांतामधून कुटुंबाला सोडून आलेल्या जवानांसाठी बरॅक दिलासा देणारी ठरणार आहे. घरापासून दूर परंतु घरासारखेच खेळीमेळीचे वातावरण बरॅकमध्ये असते. या वर्षीच्या शेवटपर्यंत सर्व बरॅक्स बांधून पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागपूर विभागातील नरखेड स्थानकावर आरपीएफ ठाणे नव्हते. आजही त्या ठिकाणी छोट्याशा खोलीत ठाण्याचा कारभार चालतो. रेल्वे संपत्तीसह प्रवाशांची सुरक्षा अशी दुहेरी जबाबदारी सांभाळीत असताना जवानांची अडचण होते. आता मात्र, एक कोटी रुपये खर्चुन या ठिकाणी सुसज्ज आरपीएफ ठाण्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.
@ फाईल फोटो