संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भगवान श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना उत्सवा निमित्त कामठी तालुक्यातील आजनी गाव काल सोमवार २२ जानेवारीला अवघे राममय झाले होते. गावातील चौकाचौकात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भगव्या पताका आणि घराघरावर भगवे ध्वज लावून या उत्सवात राम रंग ओतला होता.
आदल्या दिवशी गुरुदेव भजन मंडळ तसेच वारकरी भजन मंडळ यांच्या माध्यमातून गणपती देवस्थान परिसरात जागृती कऱण्यात आली.
गावातील हनुमान देवस्थान आणि गणपती देवस्थान येथे सोमवारी सकाळी श्री रामरायाच्या मूर्तीला नरेंद्र लोहकरे महाराज यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.यावेळी लहान थोरांचा समावेश असलेल्या हजारोंच्या संख्येने जमलेल्या गावकऱ्यांनी गावातून पालखी काढून श्रीरामाचा जयजयकार केला.
या पालखी भ्रमण अंतर्गत राम लक्ष्मण सीता हनुमान यांचा वेष धारण करून चिमुकली मुलं मुली मोठ्या आनंदाने सहभागी झाली होती. पालखी आणि श्रीराम झांकी अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आणि सरस्वती कॉन्व्हेन्टच्या विद्यार्थ्यांचे लेझिम, गावातील सर्व भजन मंडळांचे भजन यांचा समावेश होता. विशेष म्हणजे गावातील महिला मंडळाचा यात सर्वात जास्त सहभाग होता. यावेळी चौकाचौकात फुगडी सुद्धा खेळली गेली.
गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध मंडळांनी चौकाचौकात अल्पोहार आणि सरबत, चायची व्यवस्था केली होती.चौका चौकात भगव्या पताका,रांगोळ्या काढून रामारायाच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. गाव भ्रमण करून आल्यानंतर गणपती देवळात मान्यवरांच्या उपस्थितीत दहीहंडी गोपाळकाला करून पालखीची सांगता करण्यात आली.
सायंकाळी घरोघरी तसेच देवस्थान परिसरात दिवे प्रज्ज्वलित करून तसेच फटाके फोडून सर्वांनी आनंद साजरा केला.
लोकवर्गणीतून आयोजित कऱण्यात आलेल्या महाप्रसादाने या उत्सवाची सांगता करण्यात आली.यात राष्ट्र सेविका समिती रुक्मिणी शाखा, आजनी यांच्याकडून मिष्ठान्न वाटण्यात आले. गावातील जस मंडळाचा संगीतमय कार्यक्रम महाप्रसादाचे वेळी आयोजीत करण्यात आला होता.
विविध कार्यक्रम आणि भक्तिमय वातावरणाने गावात प्रती अयोध्या अवतरल्याचा भास यावेळी होत होता.गावातील लहान थोर सर्वांचा या कार्यक्रमात सहभाग होता, हे विशेष.