यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अभिषेक मेमोरियल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या विषयावर जागृती कार्यशाळेचे आयोजन अँग्लो हिंदी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश के.ए.नाहर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिषेक मेमोरियल फाऊंडेशनच्या सचिव प्राचार्य डॉ.सुप्रभा यादगिरवार तसेच प्राचार्य अंशुल जैन, ॲड राजश्री ठाकरे, ॲड भाग्यश्री खडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
बाल लैंगिक अत्याचाराबाबत समाजात विविध गैरसमज व समज यामुळे बाळगले जाणारे मौन हे गुन्हेगाराचे धाडस वाढवून गुन्ह्याचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे असे गैरसमज दूर होण्यासाठी व लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण कायदा २०१२ हा कायदा बालस्नेही असून तो तरतुदींनी व्यापक असल्याबाबत जनसामान्यात जागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुप्रभा यादगिरवार यांनी केले.
कायद्यातील बालस्नेही कायदेशिर प्रक्रिया, लैंगिक अपराधाबाबतची माहिती, बालक- गुन्हेगारांबाबतची कायद्यातील संकल्पना बालकांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत दृकश्राव्य स्लाईडद्वारे समजावून सांगितली. अशा घटना घडल्यास मुलांनी घाबरून न जाता पालक, मित्र, शिक्षक यांना तोंडी किंवा लेखी सांगावे किंवा चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क करण्याविषयी डॅा.यादगिरवार यांनी सांगितले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात न्या.नाहर यांनी विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टचबाबत मार्गदर्शन करतांना स्पर्शामागील हेतू किंवा इन्टेन्शनचे फार महत्व असते, हे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विषद केले. विद्यार्थ्यांना त्यांनी अपराधाबाबत मौन न बाळगता आवाज उठवायला पाहिजे, असे सांगितले. या प्रसंगी प्राचार्य अंशुल जैन यांनी महाविद्यालयात बालकांचे अशा अपराधापासून संरक्षण करण्याच्यादृष्टीने उपलब्ध सुविधा व धोरणांबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रा.डॉ.सचिन जयस्वाल यांनी केले. या प्रसंगी उपप्राचार्य क्षिरसागर तसेच गवई, जानी तसेच शिक्षक वृंद व वर्ग 9 वी ते वर्ग 12 वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड.राजश्री ठाकरे, ॲड.भाग्यश्री खडसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे यू.व्ही.मस्के, नितीन येलेकर तसेच अँग्लो हिंदी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.