यवतमाळ :- भारतीय टपाल विभागाच्यावतीने 1 फेब्रुवारी ला 141 वा डाक जीवन विमा दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील टपाल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांशी संवाद साधून डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा याबाबत जनजागृती करत आहेत.
डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा या योजना विश्वासार्हता, परवडणाऱ्या हप्त्याच्या सुविधा आणि आकर्षक परताव्यासाठी ओळखल्या जातात. नागरिकांनी या योजना निवडून आपल्या भविष्याची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करावी. या विशेष मोहिमेंतर्गत अधिकारी तसेच कर्मचारी घरोघरी जाऊन योजनांचे फायदे स्पष्ट करत आहे. तसेच विविध ठिकाणी शिबिरे, बैठका व चर्चासत्रे आयोजित करून लोकांना या योजनांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
आपल्या जीवनात आर्थिक सुरक्षिततेचा पाया दृढ करण्यासाठी डाक जीवन विमा दिनाचे औचित्य साधून डाक जीवन विमा पॉलिसी खरेदी करण्याचे आवाहन टपाल विभागातर्फे करण्यात आले आहे. टपाल विभागाच्या या दोनही योजनांचा लाभ घेऊन आपले व आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजच आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाचे डाकघर अधीक्षक गजेंद्र जाधव यांनी केले आहे.