– श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात पुरस्कार वितरण सोहळा
नागपूर :- गणेशोत्सवानिमित्त श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, झिल्पी, मोहगांव च्या वतीने आयोजित विदर्भ स्तरीय भव्य ‘भजन रंग’ स्पर्धेतील विजेत्यांना रविवारी (ता.२९) सिद्धिविनायक गणपती मंदिर झिल्पी, मोहगांव येथे बक्षीस प्रदान करण्यात आले.
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे सचिव शैलेश जोगळेकर यांच्या हस्ते विदर्भ स्तरीय भव्य ‘भजन रंग’ स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळी सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी, ट्रस्टचे विश्वस्त अनिरुद्ध भगत, प्रफुल्ल माटेगावकर, गजानन निशितकर उपस्थित होते.
१५ सप्टेंबर २०२४ रोजी लक्ष्मीनगर आठ रस्ता चौक येथील सायंटिफिक सभागृहामध्ये विदर्भ स्तरीय भव्य ‘भजन रंग’ स्पर्धा पार पडली. स्पर्धेत नवचैतन्य भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. नवचैतन्य मंडळाला ३१ हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या स्वरस्वरांगिणी भजन मंडळाला २१ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या नादब्रम्ह भजन मंडळाला ११ हजार रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. याशिवाय ८ भजन मंडळांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली.
स्पर्धेमध्ये विदर्भातील वेगवेगळ्या भागातील ४५ भजन मंडळांनी सहभाग नोंदविला होता. सर्व सहभागी मंडळांना प्रशस्तीपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले.