Ø नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना
Ø युवक – युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद
नागपूर :- उद्योग व औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेता, केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकासाला विशेष प्राधान्य दिले आहे. नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एकाच छताखाली शासनाने बेरोजगार युवक – युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. या मेळाव्यात उपस्थित अनेक उद्योग आस्थापनांकडून अनेक तरुण – तरुणींच्या मुलाखती घेण्यात आल्या. मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराचा मार्ग सुकर झाल्यामुळे तरुण – तरुणींनी या मेळाव्याबद्दल समाधान व्यक्त केले. एवढेच नाही तर रोजगार प्राप्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
पीएम स्वनिधी योजनेचा महिलांना आधार : अनेक छोट्या व्यवसायिकांना पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळाल्याने व्यवसायाला हातभार लागला तसेच कुटुंबाची आर्थिक परिस्थितीसुध्दा सुधारली, अशा भावना नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
पंचशिल नगर, नागपूर येथे राहणाऱ्या सुनंदा गडपायले (वय 55) सांगत होत्या, घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे यापूर्वी मिळेल ती कामे करावी लागत असे. कापडाच्या दुकानात काम करून संसाराचा गाडा कसातरी चालत होता. त्यातच वाढत्या महागाई काळात घरखर्च चालविणे कठीण होत होते. दोन मुलींच्या शिक्षणाचाही भार. त्यामुळे स्वाभाविकच शिक्षणासाठी पैसे अपूरे पडायचे. यासाठी मग काही घरी स्वयंपाकाचे काम सुरू केले. यासाठी पंचशील नगर ते रामदासपेठ असा प्रवास करावा लागायचा. जाण्या – येण्याचा खर्च परवडत नव्हता. मात्र कुटुंबाच्या परिस्थितीमुळे पार्टटाईम म्हणून स्वयंपाकाचे काम करणे आवश्यकच होते.
याच काळात मला पीएम स्वनिधी योजनेची माहिती मिळाली. सुरवातीला योजनेचा माध्यमातून 10 हजार रुपये कर्ज घेतले आणि मसाले तयार करण्याची मशीन खरेदी केली. यातून मसाला व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून महिन्याला 6 ते 7 हजार रुपयांचा आर्थिक मोबदला मिळू लागला. त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य झाले. प्रामाणिकपणे केलेल्या कर्जाची परतफेड व आर्थिक व्यवहार बघून बँकेने पुन्हा 20 हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. यातून व्यवसायाला उभारी मिळाली. सद्यस्थितीत सुनंदा गडपायले ‘मसाला’ उद्योगात खीर मसाला, पाटवडी मसाला, बिर्याणी मसाला, मटन, चिकन, पनीर मसाला तयार तयार करतात. मसाला विक्रीसुध्दा त्या स्वत:च करतात. या विक्रीतून सुनंदा यांच्या हातात अतिरिक्त पैसे येत असून व्यवसायातून मिळालेल्या आर्थिक स्थैयामुळे त्या आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे.
दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत कचरा संकलन केंद्र : दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत महिलांना आत्मनिर्भर आणि व्यावसायिक बनविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. संगिता रामटेके या सावित्रीबाई महिला बचत गट, धरमपेठ, झोन क्रमांक 2 मध्ये मागील चार वर्षांपासून काम करीत आहेत. शहरात साठलेला कचरा गोळा करणे, ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे, बेस्ट फ्रॉम वेस्ट यासंकल्पनेतून त्यावर प्रक्रिया करून पर्यावरणाचे रक्षण करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत संगिता रामटेके यांना 2018 मध्ये हिरकणी महाराष्ट्राची हा प्रथम पुरस्कार मिळाला. तसेच जी -20 अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने इंदौर, दिल्ली येथेही त्यांनी अभ्यास दौरा केला. इंदोर येथे त्यांना स्वच्छता दूत पूरस्काराने सन्मानित करण्यात आले