बदलापूर घटनेवरून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न – भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर प्रहार

– लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न

मुंबई :- बदलापूरमध्ये राज्यासाठी लज्जास्पद घटना घडल्यानंतर महायुती सरकारने तात्काळ पावले उचलली. मात्र महाविकास आघाडीचे नेते या दुर्दैवी घटनेचे राजकारण करून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, अर्चना देसाई, भारती चौधरी आदी उपस्थित होते. बदलापूर प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा नक्की होणार, महायुती सरकार त्या दिशेने प्रयत्नशील आहे अशी ग्वाही वाघ यांनी दिली. यावेळी वाघ यांनी अनेक दाखले देऊन मविआ नेत्यांच्या बदलापूर प्रकरणातील दुटप्पी भूमिकेचे वाभाडे काढले.

माणुसकीला लाजवेल अशा बदलापूरच्या प्रकरणात विरोधकांकडून महायुती सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेचा समाचार वाघ यांनी घेतला. त्या म्हणाल्या की, या प्रकरणी तात्काळ एसआयटी नेमली, अकार्यक्षम पोलिसांना बडतर्फ केले, सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक केली, सर्वपक्षीय मंडळी विश्वस्त मंडळावर असलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेची चौकशी सुरु केली, नराधमाला अटक केली. महायुती सरकारने शक्य ते सर्व तातडीने केले. याप्रकरणात एफआयआर नोंदवण्याबाबत पोलिसांकडून दिरंगाई घडल्याची टीका केली जाते आहे. मात्र लहान मुलगी पोलीस ठाण्यात आल्यानंतर लगेच वैद्यकीय तपासणीला पाठवले, तपासणीला किमान 3-4 तास लागतात. त्यानंतर तिच्याकडून पोलीस ठाण्यात जबाब नोंदवून घेतला. लहानग्या मुलीला अजून शरीराची ओळख नाही, तिच्यासोबत नक्की काय घडलं हे तिच्याकडून जाणून घेण्यासाठी वेळ लागला, असा खुलासा पोलिसांकडून केला गेला आहे. असे असताना विरोधकांकडून या दुर्दैवी प्रकरणी राजकीय पोळ्या भाजण्याचे काम केले जात आहे असा आरोप वाघ यांनी केला.

मविआ नेत्यांच्या अलीकडच्या काळातील काही वक्तव्यांचा विचार करता बदलापूरच्या दुर्दैवी घटने नंतरचे आंदोलन, रेल रोको हे सगळे मुद्दाम ठरवून होते आहे का याचा विचार सूज्ञ जनतेने करायला हवा असे वाघ यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो असे वक्तव्य केले. त्यापाठोपाठ नाना पटोले , प्रणीती शिंदे हे आंदोलनाची धग अधिक पेटवण्याच्या प्रयत्नात दिसले. आंदोलनकर्त्यांच्या हातात, ‘लाडकी बहीण योजना रद्द करा’, असे फलक का होते? संवेदनशील प्रसंगावेळी या लोकांच्या हातात असे बॅनर्स का होते असा सवाल करत बदलापूर घटनेच्या आडून लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा मविआच्या नेत्यांचा कट आहे असा घणाघात वाघ यांनी केला.

बदलापूर प्रकरणात राजकारण करत महाराष्ट्र बंद पुकारणा-या मविआ च्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकाळातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना आठवून पहायला हव्या होत्या, असा सणसणीत टोला वाघ यांनी हाणला. मविआ सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कित्येक माताभगीनींवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनांची यादीच सादर करीत उद्धव ठाकरे, मविआ सरकारची असंवेदनशीलता श्रीमती वाघ यांनी दाखवून दिली. हिंगणघाट येथे घडलेल्या महिलेला पेटविण्याच्या घटनेचे उदाहरण देऊन वाघ यांनी मविआ सरकारवर शरसंधान साधले. मविआ सरकारने अडीच वर्ष सत्ता उपभोगली मात्र हिंगणघाटच्या त्या महिलेच्या कुटुंबाला आधार दिला नाही. महायुतीचे सरकार आल्या आल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारने महिलेच्या कुटुंबाला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करत पीडित परिवाराला आधार दिला असे वाघ यांनी नमूद केले. बदलापूर प्रकरणीही लहानगीला न्याय दिला जाईल आणि नराधमाला फासावर लटकावले जाईल असा विश्वास वाघ यांनी बोलून दाखवला.

वाघ यांनी सांगितले की, सरकारी वकील म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांना कपिल सिब्बल चालतात पण उज्वल निकम चालत नाहीत . खैरलांजी, कोपर्डी, कोल्हापूर बालहत्याकांड, शक्ती मिल सारख्या अनेक दुर्दैवी घटनांमध्ये पीडित महिलांच्या बाजूने लढत नराधमांना कठोरात कठोर शिक्षा ज्यांनी दिली, ज्यांनी आत्तापर्यंत एकाही गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतले नाही ते उज्वल निकम आता या मंडळींना अचानक नकोसे झाले. मविआ सरकारच्या कार्यकाळात माताभगिनींच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भया पथकाची वाहने सुप्रिया सुळे त्यांच्या स्वत: च्या सुरक्षा ताफ्यात वापरत होत्या याचे त्यांना सोईस्कर विस्मरण झाले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज पात्र

Sat Aug 24 , 2024
मुंबई :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी रुपये 3 हजार त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यात 2 लाख 14 हजार 978 अर्ज पात्र झाले आहेत. राज्यात मुंबई विभागात 29 हजार 99, नाशिक विभागात 27 हजार 54, पुणे विभागात 74 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com