– संजीवनीला रौप्य तर पूनमला कांस्य पदक
पणजी :-प्रणव गुरवने १०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले आणि ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या पदकाची नोंद केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव व पूनम सोनुने यांनी १० हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
उत्कंठापूर्ण झालेल्या शर्यतीत पुणे जिल्ह्याचा खेळाडू प्रणवने १०० मीटर्सचे अंतर १०.४१ सेकंदात पार केले. तामिळनाडूच्या एलिक्य दासने ही शर्यत १०.३६ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले.तर सेनादलाच्या सौरभ राजेश (१०.४८ सेकंद) याला कांस्य पदक मिळाले. प्रणव हा पुण्यातील सणस मैदानावर सराव करीत असून त्याने आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत.
पदकाची खात्री होती -प्रणव
१०० मीटर्स शर्यतीत पदक जिंकण्याची मला खात्री होती, असे प्रणव याने शर्यत संपल्यानंतर सांगितले. ‘ शर्यत अतिशय चुरशीची झाली. मी सोनेरी यश मिळवण्याचा प्रयत्न केला. तथापि थोडक्यात माझे हे सुवर्णपदक हुकले. महाराष्ट्राला पदक मिळवून देण्यात यशस्वी झालो, याचे मला समाधान वाटत आहे,’ असे प्रणवणे पुढे सांगितले.
महिलांच्या १० हजार मीटर्स शर्यतीत संजीवनी जाधव हिला रौप्य तर पूनम सोनुने हिला ब्रॉंझ पदक मिळाले.
१० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत या महाराष्ट्राला पदकाची खात्री होती. कारण महाराष्ट्राच्या तीन खेळाडू सहभागी झाल्या होत्या. संजीवनी हिने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या दोनशे मीटर्स अंतरात तिचा वेग थोडासा कमी झाला. हिमाचल प्रदेशच्या सीमा कुमारी हिने वेग वाढविला आणि तिला मागे टाकून आघाडी घेत सुवर्णपदक जिंकले. तिने हे अंतर ते ३३ मिनिटे २०.७५ सेकंदात पार केले. संजीवनी हिने हे अंतर ३३ मिनिटे ३२.२७ सेकंदात पूर्ण केले. तिची सहकारी पूनम सोनूने हिने हीच शर्यत ३४ मिनिटे २९.७१ सेकंदात पार करून कांस्य पदक मिळवले.