सद्यस्थितीत राज्यात H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव नाही – अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे

मुंबई :- बर्ड फ्लू (H5N1) या नवीन रोग प्रादुर्भावाचा धोका वाढला असल्याच्या आशयाचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र सन २०२३ मध्ये सद्यस्थितीत राज्यात कुठेही H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव नाही असे अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनीटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. बर्ड फ्ल्यू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राज्यामध्ये बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव प्रथम सन २००६ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर येथे झाला होता. त्यावेळी या विषाणूचा स्ट्रेन हा H5N1 हा होता. त्यानंतर २०२१ आणि २०२२ मध्ये राज्यात आढळून आलेल्या बर्ड फ्लू रोग प्रादुर्भावातही विषाणूचा स्ट्रेन H5N1 होता. सन २०२३ मध्ये सद्यस्थितीत राज्यात कुठेही H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव झालेला नाही.

केंद्र शासनाच्या बर्ड फ्लूच्या कृती आराखड्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून बर्ड फ्लू सर्वेक्षणाकरिता नमुने प्रामुख्याने परसातील कुक्कुट पक्षी, व्यापारीतत्वावर पाळण्यात येणारे पक्षी, पक्षाचे बाजार, स्थलांतरित पक्षांचे मार्ग, पानवठ्याच्या जागा जिथे स्थलांतरित पक्षी पाणी पिण्यासाठी एकत्रित येतात, प्राणीसंग्रहालये, जंगल याही ठिकाणाहून पक्ष्यांचे नमुने गोळा करून त्याची तपासणी केली जाते. गतवर्षी राज्यामध्ये एकूण २३,३९३ इतके नमुने यादृच्छिक (Randorm); पद्धतीने गोळा करून त्याची तपासणी केलेली आहे. ज्यामध्ये एकाही पक्ष्याचे नमुने H5N1 विषाणूसाठी होकारार्थी आढळून आलेले नाहीत.

बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अधिनियमान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचना दि. १२.०१.२०२1 नुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. कुक्कुट पक्षामध्ये मरतूक झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येतात.

राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्षांमध्ये मर्तुक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तुक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये याची माहिती दयावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १९६२ किंवा १८००२३३०४१८ ह्या टोल फ्री क्रमांकावर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी.

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या कलम ४(५) अन्वये राज्यातील प्रत्येक पशुपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणा- या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी 5 कोटींची तरतूद - मंत्री दादाजी भुसे

Tue Jul 18 , 2023
 मुंबई :- परभणी जिल्ह्यातील पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.             पाथरी येथील बसस्थानकातील छताचे प्लास्टर कोसळून तीन महिला जखमी झाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सुरेश वरपूडकर, अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला होता. मंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!