संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी डॉ मिलिंद उमेकर विजयी
कामठी ता प्र 26:-असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टिचर्स ऑफ इंडिया निवडणूक -२०२२ करीता दि २४ ते २६ जुन २०२२ ला झालेल्या ऑनलाइन मतदानाद्वारे राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी डॉ मिलिंद उमेकर विजयी घोषित करण्यात आले.
असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टिचर्स ऑफ इंडिया ही भारतातील सर्व औषधीनिर्माणशास्त्र शिक्षकांची संघटना असून दर ५ वर्षांनी निवडणूक घेण्यात येते. संपूर्ण भारतात सुमारे ९ हजार फार्मसी शिक्षक हे या संघटनेचे सदस्य म्हणून नोंदणीकृत आहेत. यावर्षी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी भारतातून एकुण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. अत्यंत चुरशीच्या लढतीत महाराष्ट्रातील श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी कामठी, नागपूर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून विजयी घोषित करण्यात आले.
डॉ मिलिंद उमेकर हे संघटनेचे तत्कालीन राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. फार्मसी शिक्षण क्षेत्रात त्यांनी मागील २५ वर्षांपासून क्षेत्राचा विकास त्याचबरोबर शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी सातत्याने लढा दिला आहे. फार्मसी क्षेत्रातील संशोधन आणि विकासाच्या दृष्टीने सतत कार्य करीत असून या क्षेत्राला एक वेगळे अस्तित्व प्राप्त करून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
त्यांच्या या विजयी यशाबाबत शश्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा किशोरीताई भोयर तसेच संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांनी अभिनंदन केले. तसेच कामठी फार्मसी महाविद्यालयाची टीम एसकेबी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी ढोलताशा व गुलालाची उधळण करून अभिनंदन केले आणि विजय उत्सव साजरा केला.