किशोरवयीन मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक मोहीम राबवा – जिल्हाधिकारी यांचे निर्देश

10 ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेस सुरुवात

नागपूर :-  आतड्यातील कृमी दोषामुळे बालक व किशोरवयीन मुले मुली रक्तक्षय व कुपोषणास बळी पडतात. यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिवसाच्या निमित्ताने आरोग्य विभागाने सर्व विभागांच्या सहकार्याने जिल्हाभर जंतनाशक मोहीम राबवून ती यशस्वी करावी. यामुळे बालक व किशोरवयीन मुलांमुलीचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधूरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रेवती साबळे, मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. जोशी तसेच अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आतड्यातील कृमी दोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुलांमुलीमध्ये होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणास मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. यामुळे मुलांमुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यावर त्यांचा विपरित परिणाम होतो. तीव्र प्रमाणात कृमी दोष असलेले विद्यार्थी हे बऱ्याचदा आजारी असतात. यामुळे जतनाशक मोहिम जिल्हाभर राबविणे गरजचे असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व पालकांनी मुलांचे जंतांच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी आयोजित मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कृषी दोषामुळे विद्यार्थ्यांना थकवा येतो व अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करु शकत नाहीत. यामुळे बऱ्याचदा शाळेत मुले अनुपस्थित राहतात. आतड्यांमधील कृषी दोष हा प्रसार बालकांमध्ये दुषित मातीद्वारे सहजतेने होतो. शाळा व अंगणवाडी पातळीवरुन देण्यात येणारी जंतनाशक गोळी ही यावर परिणामकारक आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास विभाग व पाणी पुरवठा विभागांनी एकत्रितपणे ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले.

या मोहीमेचा उद्देश 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुले व मुली यांचे आरोग्य सुदृढ ठेवणे व पोषणस्थिती, शिक्षण व दर्जा उंचावणे हा असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम 10 ऑक्टोबर रोजी राबविण्यात येणार असून 17 ऑक्टोबर रोजी मॉ ॲप दिन साजरा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com